अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालाने केली शेतकऱ्याला मारहाण

अमरावती : १२ मार्च – बाजार समितीमध्ये धान्याची खरेदी होत असताना कढता, वजन काट्यावरील मोजणी एवढेच काय पण वजन करताना पडलेले धान्य यावरुन सातत्याने शेतकरी आणि हमालांमध्ये वाद निर्माण होत असतात. वजन काट्यावर मापात पाप होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. त्यामुळे काही उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रीक वजन काट्यांचे वाटप करण्यात आले आहे. पण वजन काट्यावर धान्याची मोजणी सुरू असतांना खाली पडलेल्या धान्यावरून शेतकरी आणि हमालांमध्ये दर्यापूर बाजार समितीमध्ये टोकाचा वाद झाला होता. यामध्ये हमालांनी शेतकऱ्यास मारहाणही केली. अखेर बाजारसमिती प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण मिटले. मात्र, बाजार समितीच्या ठिकाणीही शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतो हे यावरुन समोर आले आहे.
शेतकऱ्यांचा बाजार समितीमध्येच रास्ता रोको
मापात पाप किंवा वजन करीत असताना धान्याची नासाडी करायची हे हमालांचे ठरलेलेच आहे. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे धान्याची जोपासणा करायची आणि बाजार समितीमध्ये मात्र, काटा मारुन हमाल एक प्रकारे शेतकऱ्यांची लूटच करतात. असाच प्रकार ज्ञानेश्वर पांडूरंग वडतकर यांच्याबाबत घडला. धान्य नासाडीबाबत त्यांनी हमालाला विचारले असता त्यांना थेट मारहाण करण्यात आली. हमालांची ही अरेरावी पाहून बाजार समितीच्या आवारातच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता. यामुळे बाजार समितीमध्ये काही काळ तणावही निर्माण झाला होता.
ज्ञानेश्वर पांडूरंग वडतकर हे शेतकरी शेतीमाल घेऊन बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. मात्र, मालाचे वजन होत असताना अधिकतर माल हा जमिनीवरच पडत होता. असे असताना हमाल मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर शेतीमालाची नासाडी होत असल्याचे त्यांनी हमालाच्या निदर्शनास आणून दिले मात्र, येथे अशीच पध्दत असल्याचे सांगत शेतकऱ्याशीच हुज्जत घालण्यास सुरवात केली होती. अखेर शाब्दिक चकमकीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. हमाालांनी मिळून शेतकऱ्यास मारहाण केली.
हमाल आणि शेतकरी यांच्यामधील वाद विकोपाला जात असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान, झालेल्या मारहाणीवरुन शेतकऱ्यांनी थेट रास्ता रोकोच केला. यामुळे वाहतूककोंडी झाली शिवाय प्रकरण अधिकच चिघळू लागल्याने बाजार समिती प्रशासनाने हस्तक्षेप करुन संबंधित हमालावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण मिटले.

Leave a Reply