साहेब सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल आणि तेव्हाच त्याचा निकाल लागेल – प्रशांत किशोर

नवी दिल्ली : ११ मार्च – उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपाचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४ मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा यशाची पुनरावृती करेल असा दावा चार राज्यांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशानंतर बोलताना केलाय. मात्र आता यावरुन निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदींचा साहेब असा उल्लेख करत टोला लगावला आहे.
मोदींनी केलेल्या या वक्तव्याला प्रशांत किशोर यांनी विरोध केलाय. “भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल आणि तेव्हाच त्याचा निकाल लागेल. कोणत्याही राज्यांच्या निवडणुकांवरुन हे ठरणार नाही,” असं ट्विट त्यांनी केलंय. तसेच पुढे बोलताना, “साहेबांना (मोदींना) हे ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यातील निकालांवरुन असं (२०२४ च्या विजयाचं) वातावरण तयार करुन मानसिक दृष्ट्या विरोधकांविरोधात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केलाय,” असा टोला प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचा थेट उल्लेख टाळत म्हटलंय.
तसेच प्रशांत भूषण यांनी मतदारांनाही आवाहन केलं आहे. “या खोट्या कथानकाला बळी पडू नका किंवा त्याचा भाग होऊ नका,” असंही ते ट्विटच्या शेवटी म्हणालेत.
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल असंही प्रशांत किशोर यांनी जानेवारी महिन्यामध्येच म्हटलं होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना थोडा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. एका नवीन राष्ट्रीय पक्षाऐवजी राजकीय परिस्थितीबद्दल विचार करताना ‘थोडा बदल केल्यास’ हे शक्य आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले होते. “२०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणं शक्य आहे का? याचं उत्तर मी ठामपणे होय असं देईन. मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि पक्षांची धोरणं पाहता हे शक्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर कदाचित नाही, असं द्यावं लागेल,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं.

Leave a Reply