नागपुरात आझादहिंद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले

नागपूर : ११ मार्च – नागपूर रेल्वेस्थानकाच्या आउटरवर असलेल्या डायमंड क्रॉसिंगजवळ गुरुवारी सायंकाळी आझादहिंद एक्स्प्रेसचे इंजिन घसरले. त्यामुळे खळबळ उडाली.
१२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाकडे येत असतानाच डायमंड क्रॉसिंगजवळ इंजिन रुळाच्या खाली घसरले. त्यामुळे गाडीला जोराचा झटका बसला व प्रवासी घाबरले. मात्र, गाडी स्थानकात प्रवेश करीत असल्याने वेग एकदम कमी होता. या घटनेबाबत कळताच डीआरएम ऋचा खरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही गाडी नेहमी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूरला येते. मात्र, गुरुवारी ही गाडी दोन तास उशिरा धावत होती. ती प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येणार होती. गाडी येणार असल्याची घोषणा झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील या गाडीचे प्रवासी गाडीत चढायला तयार झाले होते. त्याचवेळी इंजिनची तीन चाके रुळावरून खाली आली. त्यानंतर इंजिन रुळावर आणण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले. आधी सर्व कोच इंजिनपासून वेगळे करण्यात आले. दुसऱ्या इंजिनने हे कोच नागपूर स्थानकावर आणण्यात आले. त्यानंतर जवळपास दोन तासांनी इंजिन रुळावर आले. या घटनेमुळे अनेक गाड्या आउटरवर थांबवून ठेवाव्या लागल्या. काही वर्षांपूर्वी नागपूर स्थानकावर अहमदाबाद एक्स्प्रेसही घरसली होती, हे विशेष.

Leave a Reply