चंद्रपूरमध्ये प्रकल्पग्रस्तांनी एकोना खुल्या कोळसा खाणीत केले काम बंद आंदोलन सुरू

चंद्रपूर : ११ मार्च – वरोरा तालुक्यातील एकोना येथील खुल्या कोळसा खाणीकरिता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केलाय. शेतकऱ्यांची तसेच स्थानिक बेरोजगारांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे हे आक्रमक झालेत. या अन्यायाविरुद्ध एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर जाऊ दिले जात नाही. एक जानेवारी 2022 पासून प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे लेखी आश्वासन वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. पण, अद्याप सीएसआर फंडचा वापर कोणत्याही गावात करण्यात आला नाही. सीएसआर फंड नेमका कुठं गेला, असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी विचारला.
एकोना खाणीसाठी शेतजमीन अधिग्रहित करताना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळं शेतकरी आक्रमक झालेत. आठ मार्चपासून हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. खाणीतील कोळसा बाहेर जाऊ दिला जात नाही. त्यामुळं दोन दिवसांपासून कोळसा खाण बंद आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल विचारला जात आहे.
वेकोलीने एकोना कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केलाय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुंबई येथे गेल्यानंतर करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची वाहतूक दोन दिवसांपासून रोखण्यात आली आहे. एकोना कोळसा खाणीत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकरी व बेरोजगारांवर वेकोलीकडून अन्याय केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply