संपादकीय संवाद – देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी गरजेची

काल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नियम २९३ अंतर्गत चर्चा सुरु करतांना जो गौप्यस्फोट केला तो महाराष्ट्राच्या दृष्टीने खळबळजनक ठरला आहे. या राज्यात विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा आणि प्रसंगी विरोधकांना आयुष्यातून उठवण्यासाठी कसा कट केला जातो, आणि सत्ताधारीच कसे त्याचे सूत्रधार आहेत, हे वास्तव या गौप्यस्फोटातून समोर आले आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फ़ोटावर सध्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाआघाडी सरकारचे सूत्रधार शरद पवार यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया देतांना देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. सरकारी कार्यालयामध्ये स्टिंग ऑपरेशन करून १२५ तासांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून पुरावे सादर करणे हे कौतुकास्पद असल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्याच वेळी शासकीय यंत्रणांचा साथ असल्याशिवाय सरकारी कार्यालयातून इतके मोठे स्टिंग ऑपरेशन करणे आणि पुरावे उपलब्ध करणे, हे सोपे नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. पवारांच्या या टोल्यानंतर फडणवीस सत्तेसाठी सरकारी यंत्रणेचा कसा दुरुपयोग करत आहेत अशी टीका पवार समर्थकांनी सुरु केलेली आहे.
फडणवीसांनी सरकारी यंत्रणेचा वापर केला असावा, अशी शंका व्यक्त करतांना शरद पवारांचा निशाणा केंद्रीय तपास यंत्रणांवर आहे, हे उघडच आहे. सध्या महाराष्ट्रातील महाआघाडीचे घटक पक्ष प्रत्येक गोष्टीत केंद्रीय तपासयंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप सातत्याने करत असतात. त्याचाच हा प्रकार आहे. फडणवीसांनी केंद्रीय तपासयंत्रणांच्या मदतीने या व्हिडीओ क्लिप्स मिळवल्या हा आरोप जरी मान्य केला, तरी पोलीस अधिकारी आणि सरकारी वकिलाच्या मदतीने राज्य सरकार कटकारस्थान करते आहे, या आरोपातून मुक्ती मिळू शकत नाही. फडणवीसांनी केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून या कार्यालयांमध्ये छुपे कॅमेरे बावळे असते, आणि तिथे काहीच कटकारस्थान शिजले नसते तर तपासयंत्रणा आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात काहीही लागले नसते, आडात नसते तर पोहरात येण्याचे कारणच नाही. सरकारी वकिलांच्या मदतीने कटकारस्थान शिजत होते, म्हणून तर त्याचे रेकॉर्डिंग झाले ना? मग आपल्यावर आच येते आहे, म्हणून सरकारी यंत्रणेचे नाव पुढे करून फडणवीसांना बदनाम करण्याचे काय कारण?
या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री उद्या विधिमंडळात उत्तर देणार आहेत. ते काय उत्तर देतात, त्यावरून या प्रकरणातील वास्तव काय? ते समोर येऊ शकेल, मात्र गृहमंत्री सारवासारव करण्याचा प्रयत्न करतील हे उघड आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी आज मागणी केली आहे, तीच या प्रकरणात योग्य राहणार आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply