भाजीत भाजी घोळीची अन्…..

महाशिवरात्र झाली की,वेध लागतात ते होळीचे.होळी जसजशी जवळ येते तसतसे सूर्यनारायण आपले डोळे उघडायला सुरूवात करतो. फाल्गुनात उन्हाचा तडाखा जाणवण्याइतपत वाढतो. रामाच्या नवरात्रात चैत्राचं चटका देणारं उन्ह झगझगायला सुरूवात होते.मग काय वैशाख वणवाच ! ग्रीष्माची धगधग.आणि सुरू होतो नागपूर- विदर्भातला माझा अत्यंत आवडता-लाडका ऋतु ‘ उन्हाळा ‘ !! हा माझा लाडका ऋतु का आहे ,हे मी नंतर लिहीन कधीतरी….

आज या सर्वांची चाहूल लागली ती,भाजीबाजारात (मंडईत नाही बरं )
घोळ दिसली म्हणून! कांदा,कैरी,घोळ आणि ताक हे पदार्थ म्हणजे नागपुरी माणसाची शस्त्रे आहेत,उन्हाळा सुसह्य अन् सुखकारक करायची. घोळीचेही दोन प्रकार आहेत.एक मोठ्या पानांची अन् हिरव्या दांडीची,दुसरी बारक्या पानांची अन् लाल बारीकदांडीची. शाळेत असताना एखादा निबंध किंवा कवितेचे रसग्रहण लिहून मास्तरांना तपासायला द्यायचो.त्यातील त्यांना आवडलेल्या वाक्यांखाली मास्तर लाल शाईने रेघा मारत. ‘ उत्तम ‘ असा शेरा देत.बारक्या पानांच्या घोळीच्या लाल बारीक दांड्या बघून मला त्या रेषांची आठवण येते.

घोळ ही मुंबई-पुणे- नाशिक-ठाणे या चौकोनात मिळत नाही म्हणे ! मला घोळीची भाजी अत्यंत प्रिय आहे.घोळीची चविष्ट पातळभाजी आणि वर कडकडीत लसणाच्या फोडणीचे तेल सोबत जिरे,गूळ,पुदिना,हिरव्या मिर्च्या घातलेली कैरीची चटणी ! आहाहाहा….आणि दणकून जेवल्यावर,काकडीचे काप व कोथिंबीर घातलेले जिऱ्याच्या फोडणीचे ताक. आयहायहाय !!असा उन्हाळा उपभोगता यायला हवा.

दुसरे म्हणजे बेसन पेरून किंवा लावून केलेली घोळीची भाजी. ही पोळीसोबत खाण्यात मजा असतेच पण,त्याहीपेक्षा भातात कालवून जास्त मजा येते.मऊ ,फडफडलेला वाफाळलेला भात ,त्यावर बेसन लावलेली घोळीची भाजी,त्यावर कच्चे तेल(फोडणीचे कढवलेले नाही) हे मिश्रण म्हणजे काय आनंद असतो ,तो अनुभवावा लागतो सोबत दही घातलेली कांद्याची कोशिंबीर व कैरीचा तक्कू असेल तर ,फायूच काय कितीही स्टारच्या हाॅटेलात ती मजा नाही.

कुणाला उन लागले तर जसा तळपाय,तळहात व टाळूवर कांदा चोळतात तशी घोळीची भाजीही चोळतात. अशी ही बहुगुणी घोळ.

एका विदर्भ साहित्य संमेलनात ( मला वाटते चंद्रपूरला झालेले ४१ वे संमेलन असावे.) संमेलनाचे अध्यक्ष मो.दा.देशमुख,कथाकाकर के.ज.पुरोहित,न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी,स्वागताध्यक्ष सुरेश द्वादशीवार,आम्ही कार्यकर्ते वगैरेंच्या भोजनसमयी गप्पा सुरू होत्या.संमेलन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध उन्हाळ्यात झाले होते.तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी उद्घाटक होते.गप्पांच्या ओघात चंदूकाका म्हणाले,’ मुंबईला घोळ मिळत नाही.नागपूरहून कुणी ओळखीचा उन्हाळ्यात मुंबईला येत असला की,मी भरपूर घोळ मागवतो.मग मुंबईतल्या नागपुरी मित्रांना बोलावून खास घोळीच्या भाजीचीच मेजवानी करतो.’ पुरोहितांनीही त्याला दुजोरा दिला.कारण तेही मूळचे नागपुरीच ना!तात्पर्य काय,जातिवंत नागपुरी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी घोळीची भाजी विसरूच शकत नाही.

आमची ही खरोखरच सुग्रण आहे.आज तिने मी कौतुकाने आणलेल्या घोळीची या सीझनमधली पहिली पातळभाजी केली.अत्यंत चविष्ट आणि नागपुरी चवीची. आता ती भाजी अंगात आलीय्.
डोळ्यांवर झापड येतेय्.अंमळ वामकुक्षी घेतो.तुम्ही पण घोळ आणा आणि कुठलाही घोळ न घालता तिची भाजी करा.आम्हाला बोलवा मात्र,विसरू नका.

Leave a Reply