आता मुंबईतील महिला पोलिसांना ८ तासांची शिफ्ट

मुंबई : ८ मार्च – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. मंगळवारपासून त्यांना 8 तासांची शिफ्ट मिळणार आहे . पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. महिला कर्मचार्यांना घर आणि कामामध्ये चांगलं संतुलन राखण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हे निर्देश पुढील आदेशापर्यंत मुंबईत लागू राहतील, असं अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं.
संजय पांडे यांनीच या वर्षी जानेवारी महिन्यात राज्याचे कार्यकारी डीजीपी म्हणून 24 तास ड्युटी उपक्रमाला सुरुवात केली होती. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सीपीच्या आदेशानुसार महिला कर्मचाऱ्यांसाठी 2 पर्याय आहेत. पहिल्या पर्यायामध्ये त्यांना सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 8 अशा तीन शिफ्टमध्ये काम करावं लागेल.
दुसऱ्या पर्यायामध्ये, शिफ्टच्या वेळा सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ड्युटीच्या वेळेबाबत महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही पर्यायांनुसार त्यांना ड्युटी सोपवावी, असं आदेशात म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. याच कारणामुळे 12 तासांची ड्युटी त्यांना कागदोपत्री असली तरीही अनेकदा त्यांची ड्युटी 16 ते 24 तासांपर्यंत सुरूच राहाते. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तर होतोच मात्र सोबत घरात योग्य वेळ देता न आल्याने कौटुंबिक जीवनावरही याचे परिणाम होतात. याच कारणामुळे टप्प्याने संपूर्ण राज्यात 8 तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र मुंबईत अद्याप ती झालेली नव्हती. अशात आता महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलिसांना ही खास भेट देण्यात आली आहे.

Leave a Reply