अपघाताचा बनाव रचून परस्पर विकली ट्रकमधील २६ लाखाची विदेशी दारू

वर्धा : ८ मार्च – नाशिक येथून ट्रकने ८0 लाख रुपये किमतीची विदेशी दारू घेऊन निघालेल्या ट्रक नागपूरकडे जाताना त्यातील २६ लाख रुपये किमतीची विदेशी दारू परस्पर विकून ट्रकच्या अपघाताचा बनाव रचणाऱ्या ट्रकच्या चालकाविरुद्ध कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या ट्रकचा चालक सुरेश घुले (वय ३७) रा.नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारंजा पोलिस त्याचा शोध घेत आहे.
नागपूर ते अमरावती महामार्गावरील कारंजाजवळच्या सावळी खुर्द शिवारातील नाल्यात ट्रक शिरला असा या अपघाताचा बनाव तयार करण्यात आला होता.मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथून एमएच २२ एन २५५५ क्रमांकाचा ट्रक दारूचा साठा घेऊन नागपूरकडे निघला होता.पण त्यातील तब्बल २६ लाख रुपयांची दारू परस्पर विकून ट्रकच्या चालकाने ट्रक सावळीजवळील नाल्यात घुसविला.त्यानंतर ट्रक सोडून ट्रकचा चालक पसार झाला. दरम्यान ट्रकचा अपघात झाल्याचे समजून तसेच त्यात दारू साठा असल्याचे पाहून पोलिसांनी या भागात बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा ट्रकमधील तब्बल विदेशी दारूच्या ४00 पेट्या बेपत्ता होत्या.त्यानंतर राकेश गुजर यांनी याबाबत कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली.तक्रारीत ट्रकचा चालक सुरेश घुले याच्या नावाचा उल्लेख असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मानकर, प्रदीप कुंभारे तपास करीत आहे.

Leave a Reply