रशियाने युक्रेनच्या निवासी इमारतीवर टाकला ५०० किलोचा बॉम्ब!

नवी दिल्ली : ७ मार्च – रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येतोय आणि बॉम्बने देखील हल्ला करण्यात येत आहे. अशातच युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रविवारी रशियाने टाकलेल्या एका ५०० किलोच्या बॉम्बचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो चेर्निहाइव्हमधील निवासी इमारतीवर रशियाने टाकलेल्या आणि स्फोट न झालेल्या शेलचा आहे. दरम्यान, फोटो शेअर करत कुलेबा यांनी नाटोला युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर नो-फ्लाय झोन घोषित करण्याचे आवाहन केले आहे.
एका ट्विटमध्ये, कुलेबा म्हणाले की, “हा भयानक ५०० किलोंचा रशियन बॉम्ब चेर्निहाइव्हमधील निवासी इमारतीवर पडला. सुदैवाने त्याचा स्फोट झालेला नाही. मात्र, रशियाच्या आतापर्यंतच्या हल्लात आमचे निष्पाप पुरुष, स्त्रिया आणि मुले मारली गेली आहेत. आमच्या लोकांना या रशियन रानटी लोकांपासून वाचविण्यात आम्हाला मदत करा. युक्रेनची हवाई हद्द बंद करा किंवा आम्हाला लढाऊ विमाने द्या. हे दोनच हा रक्तपात आणि युद्ध थांबवण्याचे मार्ग आहेत,” असं ते म्हणाले
युक्रेनवर उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र (नो-फ्लाय झोन) लागू करावे असे आवाहन त्या देशाचे अध्यक्ष वोल्दिमिर झेलेन्स्की यांनी परराष्ट्रांना केले आहे. अशा प्रकारे नो-फ्लाय झोन जाहीर करण्यामुळे परराष्ट्रांच्या सैन्याचा थेट संबंध येणार असल्याने रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष चिघळण्याचा धोका वाढणार आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रांची कुमक पुरवली असली, तरी त्यांनी आपल्या फौजा पाठवलेल्या नाहीत.

Leave a Reply