गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळला

नागपूर : ७ मार्च – गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नागपूर भेटीत जिल्ह्यातील पक्षातील वाद चव्हाटय़ावर आले. प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना हॉटेलबाहेर उमरेड विधानसभा क्षेत्र अध्यक्षाने आरडाओरड करीत आपल्यावर अन्याय होत असल्याचा पाढा वाचला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून तणाव शांत करावा लागला. वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर होते. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री हे पद रिक्त होते. महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क मंत्री म्हणून ते पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी दौऱ्यात खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत दिवसभरात कार्यक्रम आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना हजेरी लावली.
एमटीडीसी हॉटेलमध्ये प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शहर व ग्रामीणमधील पदाधिकारी, कार्यकर्ते नेत्यांना भेटण्यासाठी गोळा झाले होते. त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नव्हता. यामध्ये पक्षाचे उमरेड विधानसभेचे प्रमुख विलास झोडापे यांनी हॉटेलबाहेर आवाज वाढवून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले. पक्षातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रमेश बंग यांनी आपली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून अटकेचा आग्रह धरला आहे. त्यामुळे गेल्या १० ते १२ दिवसांपासून त्रस्त आहे, असा आरोप केला. या प्रकरणाने हॉटेलबाहेर थोडावेळ तणाव निर्माण झाला होता. झोडापे सह काही कार्यकर्त्यांनी बैठकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. पोलिसांनी हस्तक्षेप करून शांत करण्याचे आवाहन केले. मात्र, या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंर्तगत वाद चव्हाटय़ावर आले. त्यानंतर झोडापे यांनी गृहमंत्र्याची भेट घेतली आणि झाला प्रकार कथन केल्याचे समजते.
माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि वळसे पाटील यांनी नागपुरात पक्ष कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून महापालिका निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडला. यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार प्रकाश गजभिये आदी प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी दिसून आली. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काँग्रेससोबत आघाडी करावी. मतांचे विभाजन टळून पक्षाला फायदा होईल, असे मत व्यक्त केले. परंतु शहराध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांनी पक्षात अनेक नवीन लोक येत आहेत. कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहेत. आघाडी झाल्यास या कार्यकर्त्यांना सामावून घेणे शक्य होणार नाही, अशी भूमिका मांडली.
भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी दलित महिलांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केली होती. चित्रफितीचा पुरावा पोलिसांकडे आहे. परंतु पोलीस त्यांना अटक करीत नाही, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. त्यावर यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी बोलण्याचे आश्वासन दिले.
जय जवान जय किसानचे कार्यकर्ते एमटीडीसी हॉटेलसमोर भष्ट्राचारी नागपूर मेट्रो असे लिहिलेले मास्क घालून उभे होते. या संघटनेने महामेट्रोच्या कामातील गैरव्यवहाराबाबत अनेकदा आंदोलने केली. या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यानंतरही ते उपस्थित करीत असलेल्या मुद्यांची सरकार दखल घेत नाही. आज अखेर या संघटनेने या मुद्यांकडे लक्ष वेधले. वळसे पाटील यांना निवदेन दिले.

Leave a Reply