मणिपूरमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, २ नागरिकांचा मृत्यू

इम्फाळ : ६ मार्च – मणिपूर विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. याच दरम्यान हिंसाचाराच्याही काही बातम्या समोर येत आहेत. हिंसाचारात आतापर्यंत दोन सामान्य नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. हे दोन्ही मृत्यू वेगवेगळ्या भागात झाले आहेत.
हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळतेय.
सेनापती भागात मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाणाऱ्या एका बसला काही असामाजिक तत्त्वांनी लक्ष्य केलंय. मतदान केंद्राकडे जात असताना या बसवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झालाय.
मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २२ जागांसाठी शनिवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसून येतेय. सकाळी ९.०० वाजेपर्यंत ११.४० टक्के मतदानाची नोंद झालीय. दुसऱ्या टप्प्यात थौबल, चंदेल, उखरुल, सेनापती, तामेंगलाँग आणि जिरीबाम जिल्ह्यातील २२ जागांसाठी मतदान सुरू आहे.
मणिपूर विधानसभेच्या ३८ जागांसाठी सोमवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. राज्यातील ५ जिल्ह्यांतील ३८ जागांवर सोमवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ७८.०३ टक्के मतदान नोंदवण्यात आलं. त्यापैंकी कांगपोकपी इथं सर्वाधिक ८२.९७ टक्के मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचंही भवितव्यही ईव्हीएममध्ये कैद झालंय.
मणिपूरसहीत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या सर्व राज्यांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

Leave a Reply