नेहरूंच्या धोरणानेच पंतप्रधान मोदींना वाचवले – संजय राऊत यांचा टोला

मुंबई : ६ मार्च – रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. मात्र, त्याआधीपासूनच तिथल्या भारतीयांचं काय होणार? ते सुरक्षित मायदेशी पोहोचणार का? अशी चर्चा आणि संबंधित भारतीयांच्या कुटुंबियांना चिंता लागलेली होती. यासंदर्भात अनेक प्रयत्नांनंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय, विशेषत: तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतात परतू लागले आहेत. मात्र यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली आहे. संजय राऊतांनी सामनामधील आपल्या रोखठोक या सदरात युक्रेनमधील भारतीयांच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या प्रचारामध्ये युक्रेनमधील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा संदर्भ दिला होता. यावरून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.
“युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थी अडकून पडल्यानंतर त्यांना आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवावं लागलं. दोन विद्यार्थी मरण पावले, तर शेकडो विद्यार्थ्यांना नरकयातना भोगत पायपीट करावी लागली. हिंदुस्थान सामर्थ्यवान असल्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांची रशिया-युक्रेन सीमेवरून सुटका होऊ शकली, असे प्रचारकी भाषण पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात केले. सत्य हे आहे, की हजारो विद्यार्थ्यांना पहिले आठ दिवस वालीच नव्हता. उपाशी चालत शेकडो मैल ही मुलं पोलंड, रुमानिया, स्लोव्हाकियाच्या सीमेवर बेवारस अवस्थेत उभी होती”, असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.
दरम्यान, हे सर्व सुरू असताना आपलं परराष्ट्र मंत्रालय काय करत होतं? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. “या मुलांच्या आक्रोशाच्या ठिणग्या पडू लागल्या, तेव्हा सरकारला हालचाल करावी लागली. विदेश मंत्रालय या काळात नेमकं काय करत होतं? पंडित नेहरूंनी त्यांच्या काळात विदेश मंत्रालय एक स्वतंत्र इन्स्टिट्यूशनप्रमाणे विकसित केलं. एक महान परंपरा आपल्या विदेश मंत्रालयाला लाभली आहे. पण विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे”, असं संजय राऊतांनी नमूद केलं आहे.
“ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करत राहिले, तोच अलिप्तवाद त्यांना रशिया-युक्रेन वादात ‘युनो’मध्ये स्वीकारावा लागला! नेहरूंच्या धोरणानेच पंतप्रधान मोदींना वाचवले”, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

Leave a Reply