नागपुरातील हवाला व्यापाऱ्यांवर धाडी, ४ कोटी २ लाखांची रोकड जप्त

नागपूर : ६ मार्च – नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात रात्री उशिरा हवाला व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या तीन पथकांनी एकाच वेळी धाडी टाकत तब्बल 4 कोटी 2 लाखांची रोकड जप्त केली आहे. नेहल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकर आणि शिवकुमार हरिश्चंद दिवानीवाल यांच्यावर पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांना मोठं घबाड हाती लागल्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आणि सहायक पोलीस आयुक्त सुर्वे यांच्या नेतृत्वात तीन पथकांनी धाड टाकण्याची कारवाई केली.
नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल परिसरातील रेणुका माता मंदिर शेजारी असलेल्या एका अपार्टमेंट मध्ये हवालाची मोठी रक्कम आली असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. माहितीची सत्यता पटवल्यानंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी तीन पथकांचे गठन केले. पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्या अपार्टमेंटवर छापा टाकून हवालाचे तब्बल 4 कोटी 2 लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा नेहल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकर आणि शिवकुमार हरिश्चंद दिवानीवाल हे हवाला व्यावसायिक त्याठिकाणी उपस्थित होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी हवाला व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. हजारो कोटींमध्ये हवालाचा व्यवसाय सुरू आहे,यामध्ये गुंतलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरच्या रात्री एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी झालेल्या कारवाईत ८४ लाखांची रोकड पोलिसांच्या हाती लागली होती. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत एकाच वेळी नऊ हवाला व्यावसायिकांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती.

Leave a Reply