अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची विटंबना

अमरावती : ६ मार्च – जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले. त्यामुळे रिद्धपुरात तणाव निर्माण झाला होता. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले.
या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना कळताच पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. याच दरम्यान काही गावकऱ्यांनी मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर असलेल्या बसस्थानकावर एकत्र येऊन टायर जाळून घटनेचा निषेध केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, उपविभागीय अधिकारी नीतीकुमार हिगोले, तहसीलदार सागर धावडे, शिरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कडूकर व अन्य कर्मचाऱ्यांनी रिद्धपूर गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्वच्छ करण्यात आला. उपविभागीय अधिकारी हिगोले यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. रिद्धपूर येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही लावण्यात यावी, अशी मागणीसुद्धा यावेळी ग्रामस्थांनी केली. येत्या चोवीस तासाच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने तणाव निवळला.

Leave a Reply