सोलापुरात राज्यपालांना भगवे झेंडे दाखवत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नोंदविला निषेध

सोलापुरात राज्यपालांना भगवे झेंडे दाखवत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नों

सोलापूर : ४ मार्च – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
स्वामी विवेकानंद केंद्राच्या जुळे सोलापुरातील नव्या वास्तुचे लोकार्पण करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांचा दौरा ठरला होता. परंतु औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन हाती घेतले आहे. सोलापुरातही त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीसह इतर शिवप्रेमी संघटना एकवटल्या होत्या.
राज्यपाल जोपर्यंत रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना सोलापूरसह राज्यात कोठेही फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. राज्यपालांच्या विरोधात आंदोलनासाठी होटगी रोड विमानतळाबाहेर व इतरत्र हजारो कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे नियोजन आखण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. विमानतळापासून ते आसरा चौक व जुळे सोलापुरात पोलिसांच्या बंदोबस्ताला छावणीचे स्वरूप आले होते. दुसरीकडे आसरा चौकात एका रस्त्यावर महाविकास आघाडीसह अन्य संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन राज्यपालांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. राज्यपाल कोश्यारी यांचा ताफा तेथून पुढे जात असताना त्यांच्या समोर निदर्शने करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर पद्माकर काळे, काँग्रेसचे पालिका गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, दास शेळके, प्रताप चव्हाण आदींचा या आंदोलनात सहभाग होता. निदर्शने झाल्यानंतर शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

Leave a Reply