मुख्यमंत्र्यांशी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा, त्याची दृश्यफळे लवकरच सर्वांना पाहायला मिळतील – संजय राऊत

मुंबई : ४ मार्च – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. त्याची दृश्यफळे तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची संजय राऊत यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या दोन्ही भेटीनंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा सूचक इशारा दिला. नवाब मलिक यांच्या कुटुंबियांना भेटणे हे आमचे कर्तव्य आहे. ते आमचे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना या प्रकरणात अटक केली ती किती बोगस आणि खोटी आहे, हे कोर्टात सिद्ध झालंय. त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आलो. मुख्यमंत्र्यांपासून सगळे त्यांचासोबत आहोत हा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना दिला, असंही त्यांनी सांगितलं.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून मोर्चा काढला जात आहे, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांना मोर्चा काढू द्या. ते विरोधी पक्षात आहेत, विधायक कामांमध्ये विरोधी पक्षाने लक्ष दिले तर देशात आणि राज्यात ते चांगलं काम करू शकतात. पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारांना बदनाम करायचे, कामात अडथळे आणायचे, राज्यपालांच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या असे प्रकार केल्यावर राज्यात आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असं त्यांना वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल त्यांचे भाषण अर्धवट सोडले. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडण्याची काहीच गरज नव्हती. गोंधळ घालणारे त्यांचेच लोक होते. मला असे वाटते की संपूर्ण प्रकार स्क्रिप्टड होता. आधीच ठरवुन आले होते की राज्यपालांनी काय करायचे. राज्यपाल या नाट्याचे महानायक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यपालांना केंद्रात परत पाठवावे या विषयावर मी काही बोलणार नाही. हा विधिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, त्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान कार्यालयाला मी माझ्याकडे असलेल्या माहितीचा काही भाग दिला आहे. तेही पुराव्यासह, आणि त्याची माहिती मी लवकरच शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन उघड करेन, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply