आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात शेतजमीन बळकावल्याचा आरोप

नागपूर : ४ मार्च – वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी यांनी आपली शेतजमीन बळकावली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारी याचिका एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. रिटा अशोक म्हैसकर असं या याचिकाकर्त्या महिलेचं नाव आहे.
सकर यांच्या याचिकेनुसार, त्यांची बुलडाणा जिल्ह्यातील मोटाळा तालुक्यातील राजूर गावात दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी २१ जुलै २०२१ ला त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. त्यांच्या शेतजमिनीवरची कुंपणे त्यांनी काढून फेकली. तिथे त्यांनी अवैधरीत्या फार्म हाऊस बांधले. त्यांच्या शेतजमिनीत उत्खनन केले. त्यातून मुरूम काढला. याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला तेव्हा त्यांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
तसेच ही शेतजमीन कवडीमोल भावाला विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. तसं न केल्यास आपल्याला जीवे मारण्याची धमकी गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. म्हैसकरांनी याबाबत १२ ऑगस्ट २०२१ रोजी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यांनी पोलिसांसह राज्य शासनाकडे ऑनलाईन तक्रारही केली.
पोलिस उपनिरीक्षक भुसारी यांनी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांच्या तक्रारीला उत्तर दिलं होतं. या प्रकरणी पोलिसांची दिशाभूल करण्यात येत असल्याची लेखी माहिती म्हैसकर यांनी उपनिरीक्षक भुसारी यांना दिली. मात्र, यावरही कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने दिसून आल्याने अखेर त्यांनी अॅड. इशान सहस्त्रबुद्धे आणि ॲड. एस. डी. दातार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे वर्ग करावा, अशी विनंती केली. न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने बोरखेडी पोलिसांना नोटीस बजावली आहे.

Leave a Reply