ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना युद्धग्रस्त देशात मुले अडकून पडण्याचं दु:ख कळणार नाही – नाना पटोले

गोंदिया : २ मार्च – युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली असताना खार्कीव्ह शहरात मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले असून, देशापुढे वेगवान मदतकार्याचे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे सरकारकडून युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं जात असलं तरी दुसरीकडे विरोधकांनी मात्र सरकारने उशीरा हलचाली सुरु केल्याने विद्यार्थी अडकून पडल्याची टीका केलीय. अशाचत आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याच विषयावरुन टीका करताना पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधलाय.
गोंदीयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी पंतप्रधानांवर खोचक शब्दात टीका केली. “मी तिथल्या विद्यार्थ्यांसोबत स्वत: बोललोय. मी तिथल्या विद्यार्ध्यांच्या संपर्कात आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही अनेकदा कळवलं. जसं करोना कालावधीमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका दुसऱ्या लाटेत आल्या. देशाचे प्रधानसेवक प्रचारातच अडकले, त्यामुळे गंगा नदीत लोकांची प्रेतं पहायला मिळाली, मग ते जागे झाले. दुसऱ्या लाटेत पाच राज्यांच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये करोनामुळे अनेकांचा जीव गेल्याचं पाहिलं आपण,” असं पटोले म्हणाले आहेत.
याच गोष्टी पुन्हा एकदा घडत असल्याचं नाना पटोलेंनी पुढे बोलताना म्हटलंय. “त्याचप्रमाणे आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरु झाल्यात. या निवडणुकांच्या कालावधीमध्येच रशियाच्या माध्यमातून सातत्याने युक्रेनमध्ये युद्धाचा इशारा दिला जात होता. तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाकीचे देश आपल्या आपल्या पोरांना घेऊन गेले. पण आपल्या देशातून कुठली मदत केली नाही, युक्रेनमधील आपल्या देशातील राजदूत साधा फोन घ्यायला तयार नाहीत. म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीत. जे आतून आम्हाला ऐकायला मिळालं त्याप्रमाणे केंद्राने सांगितलं होतं की काही बडबड करुन नका आम्ही सगळं बघून घेऊ,” असा दावा पटोलेंनी केलाय.
पुढे बोलताना पटोलेंनी मुलाबाळांचा उल्लेख करत ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना मुलं परदेशात युद्धग्रस्त देशात अडकून पडण्याचं दु:ख कळणार नाही असं म्हटलंय. “आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या परिवाराला काय वेदना होत असतील हे ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना कळणार नाही,” असा टोला पटोले यांनी पंतप्रधान मोदींचा प्रत्यक्ष उल्लेख न करता लगावलाय.
खऱ्या अर्थाने केंद्रातलं सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडलेलं आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे.
तुम्ही तिथले बंकरमधील व्हिडीओ पाहिले असतील. एक मुलगी सांगते की मुलीच गायब करतात तिथून. मुलांना काही करत नाही. त्या मुली कुठे जातात आम्हाला काही खलत नाही. ते व्हिडीओ पाहून माणूस सुन्न होतो. अशी सगळी परिस्थिती असताना आता देशाचे प्रधानमंत्री जागे झालेत,” अशी टीकाही पटोले यांनी केलीय.

Leave a Reply