अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री तसेच आमदारांनी उपस्थित रहावे – शरद पवार यांचे आदेश

मुंबई : २ मार्च – उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री तसेच आमदारांनी उपस्थित रहावे, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. याबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्यासहित इतर नेत्यांची उपस्थिती बैठकीला होती.
ईडीकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असली तरी, पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच त्यांच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर बाबी तपासण्यासाठी त्यांचे वकील आणि कुटुंबांकडून पूर्ण तयारी सुरू असल्याचे देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. सध्या नवाब मलिक हे ईडी कोठडीत असून, 3 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply