शेजारच्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याचा भयंकर त्रास – वाद थेट उच्च न्यायालयात

नागपूर : १ मार्च – पाळीव प्राणी आणि विशेषत: कुत्रा पाळण्याचे वेड अनेकांना असते. मात्र, सतत भूंकत राहणारी कुत्री त्रासदायक ठरू शकतात. शहरातील त्रिमूर्तीनगरातील दोन वृद्ध महिलांना त्यांच्या शेजारच्याकडील कुत्र्याच्या भुंकण्याचा भयंकर त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी दाद मागितल्यानंतर आता अखेर त्यांनी अखेर उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे.
दोन वृद्ध महिला सख्ख्या बहिणी आहेत. त्या दोघी माईग्रेन आणि और अपस्मारसांरख्या आजाराने त्रस्त असून, त्या अविवाहित आहेत. त्यांच्या शेजारच्यांनी जर्मन शेफर्ड प्रजातीचा कुत्रा पाळला आहे. तो दिवसरात्र भुंकत असतो, असा आरोप या महिलांनी केला आहे. त्याचे विनाकारणचे भुंकणे बंद व्हावे, यासाठी या कुत्र्याला प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना त्यांनी अनेकदा त्यांच्या शेजारच्या कुटुंबाला केली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. या कुत्र्यामळे होणारा त्रास संबंधित महिलांना असह्य झाला आहे. दिवसरात्र होणाऱ्या त्रासाने त्या पूर्णपणे वैतागल्या आहेत. यानंतर त्यांनी नगरसेवक, महापौर, मनपा प्रशासन, पोलिस विभाग आणि पशू संवर्धन विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, कुणीच त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी त्यांचे अॅड. सिबघतुल्लाह जाहगीरदार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली. मालकाने या कुत्र्याला प्रशिक्षण देऊन त्याचे भूंकणे थांबवावे अन्यथा महापालिकेने त्याला आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने महापालिका प्रशासन, पोलिस आणि पशू संवर्धन विभाग यांना नोटिसा बजावल्या आहेत.
भुंकणे हा कुत्र्याचा गुणधर्म आहे. मात्र, शेजाऱ्यांना त्याचा त्रास होत असल्यास कुत्र्याला शांत करणे ही मालकाची जबाबदारी आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शिकेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, या वृद्धेच्या शेजाऱ्याकडे कुत्रा पाळण्याचा परवाना आहे. कुत्र्याने घाण केल्यास किंवा चावा घेतल्यास महापालिका त्यावर कारवाई करू शकते. कुत्र्याचे भुंकणे महापालिका थांबवू शकत नाही, असे उत्तर महापालिकेने आपल्या शपथपत्रात दिले आहे.

Leave a Reply