कोरोना लस घेतल्यावर मिळतात पैसे, अशी थाप मारून केली महिलेची फसवणूक

नागपूर : १ मार्च – शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. एका 65 वर्षीय महिलेची फसवणूक झाली. ताराबाई हेडाऊ असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या पाचपावली भागात राहतात. ताराबाई या शांतीनगर परिसरातील बाजारात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना एक साधारणतः 35 वर्षीय महिला भेटली. तिने ताराबाई याना तुम्ही कोरोनाची लस घेतली का विचारलं. वृद्ध महिलेने लस घेतली असल्यानं होकार दिला. मग त्या महिलेने लस घेतली तर पैसे मिळतात. तुम्हाला माहीत नाही का, असं विचारलं. यावर या वृद्ध महिलेने विश्वास टाकला. आणि तिथंच फसगत झाली. आजीबाई तुम्ही माझ्यासोबत बँकेत चला. असं म्हणून आरोपी महिलेनं आजीबाईला बँकेकडे घेऊन गेली.
आरोपी महिलेने वृद्ध महिलेला ऑटो रिक्षात बसविले. तुम्हाला कर्ज पाहिजे का, असंही विचारलं. ताराबाई यांनी तिथंही होकारचं दिला. तिच्या कानातील सोन्याचे दागिने दे. मग कर्ज मिळवून देतो, असं म्हणून तिच्या कानातील दागिने काढायला लावले. कानातील दागिने घेऊन तिला बँकच्या बाहेर उभं राहायला सांगितलं. स्वतः बँकेत जात असल्याचं दाखवलं आणि नजर चुकवून दागिने घेऊन ती पसार झाली. ताराबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला. अशी माहिती शांतीनगरचे पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली.
सर्वसाधारण महिलांना लुटण्याचा हा नवीन प्रकार समोर आला. त्यामुळे कोणी काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास न ठेवता आधी खात्री करा असा सल्ला पोलीस देत आहेत. कोरोनाची लस घेतली असेल तर पैसे मिळतात. बँकेत चला असं एका 65 वर्षीय महिलेला सांगून तिची फसवणूक करण्यात आली. महिलेने सोन्याचे कानातील दागिने घेऊन पसार झाली. पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्या फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला.

Leave a Reply