आता पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का? – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : १ मार्च – भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. रशिया हा ब्रिक्स देशांचा सदस्य राष्ट्र असल्याचा संदर्भ देत स्वामींनी ही टीका केलीय.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांच्या समुहाच्या स्थापनेला २०२१ साली १५ वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्त या देशांनी काही समान कार्यक्रमांवर सहमती दर्शवली होती. सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य’ अशी २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना होती. याच परिषदेमध्ये संमत करण्यात आलेल्या ठरावांच्याविरोधात जात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय. याच परिषदेचा संदर्भ देत त्यांनी आता पंतप्रधान मोदी पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का असा प्रश्न उपस्थित केलाय.
रशियाने युक्रेनमध्ये ब्रिक्स देशांनी मागील वर्षी मंजूर केलेल्या दिल्ली कराराचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का?”, असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी ट्विटरवरुन विचारलाय.
नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेनमधील सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी (२४ फेब्रुवारी २०२२ रोजी) रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केलं होतं.

Leave a Reply