राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे – उदयनराजे भोसले

सातारा : २८ फेब्रुवारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद पडताना दिसत आहेत. आता खासदार उदयनराजे भासले यांनी देखील ट्वीट करत भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यात उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ होत्या, असं मत व्यक्त केलं. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचं म्हटलं.
उदयनराजे भोसले म्हणाले, “राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.”
रोहित पवार म्हणाले, “खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी.
“राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply