अटक व्हायला नको होती. नवाब मलिक चांगला माणूस आहे – रामदास आठवले

शिर्डी : २८ फेब्रुवारी – मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. या कारवाईबद्दल एकीकडे भाजपचे नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तरदुसरीकडे, ‘नवाब मलिक यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक माणूस चांगला आहे’ असं वक्तव्य रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवलेंनी केलं.
रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवर भाष्य केलं.
‘आम्हाला सरकार पाडायचे आहे हा आरोप बिनबुडाचा आहे. काही आमदारांची चौकशी करून सरकार पाडण्याचा आमचा प्रयत्न या आरोपात तथ्य नाही. नवाब मलिक यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक माणूस चांगला आहे. परंतु, जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. ईडीकडे त्यांच्या विरोधात पुरावे म्हणून अटक केली. त्यात भाजप सरकारचा काही संबंध नाही. कुणाला त्रास द्यावा ही भूमिका आमची नाही. नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकासवाले आहेत. त्यामुळे विकास करा पण भ्रष्टाचार करू नका. कुणाच्याही जमिनी बळकावू नका, असं आठवले म्हणाले.
उद्धव ठाकरेंना ऑफर
शिवसेनेवर लोक नाराज असून शिवसैनिकांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला आतून विरोध आहे. त्यांना अजूनही वाटते भाजपा सोबत जायला पाहिजे. अजूनही वेळ गेली नाही उद्धव ठाकरेंनी विचार करावा. त्यांनी संजय राऊतांच्या भडकवण्याच्या मागे जाऊ नये. उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे विचार करावा. अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर भाजपसोबत यायला हरकत नाही. दिर्घकाळ राजकारण करायचे असेल तर अजूनही विचार करण्याची वेळ गेली नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
संच, मात्र त्यांना जो विचार करायचा करु द्या आम्हाला सत्तेची हाव नाही. अडीच वर्षे गेली आता आणखी अडीच वर्षे थांबायला आम्ही तयार आहोत, 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपा – आरपीआयचे सरकार येणार. त्या दृष्टीने आमची वाटचाल आणि प्रयत्न सुरू, असंही आठवले म्हणाले.
‘मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइंला 35 ते 40 जागा हव्यात’
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणूक होणार आहे. आरपीआय भाजपसोबत राहाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत आरपीआयला जागा मिळाव्यात यासाठी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. जनरल जागेबाबत अडचण असेल तर आरक्षित जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. महानगर पालिकेत सुद्धा भाजपासोबतच राहणार आहे. मुंबई महानगपालिकेत रिपाइंला 35 ते 40 जागा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. यावेळी आम्ही मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून हिसकावून घेणार आहोत, असंही आठवले म्हणाले.

Leave a Reply