२०२४ पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल – ईडीच्या धाडसत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : २५ फेब्रुवारी – मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक इशारा दिला आहे. २०२४पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल. महाराष्ट्राला सहन करावे लागेल असही राऊत म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालला सहन करावं लागेल. उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करावे लागेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही छापेमारी सुरू झाल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आज त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत.
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरात सुरू होत आहे. उद्या महापालिकेच्या शिपायांवरही रेड टाकतील. महापालिकेतील काही शिपाई धनुष्यबाण लावतात. मराठी लोक आहेत. शिवसेनेवर त्यांचे प्रेम आहेत. त्यामुळे ते धनुष्यबाण लावतात. आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 2024 पर्यंत आम्हाला हे सहन करायचे आहे. महाराष्ट्राला सहन करायचे आहे. पश्चिम बंगालला सहन करायचे आहे. उत्तराखंडला सहन करायचे आहे. पंजाबलाही सहन करायचे आहे, असही राऊत म्हणाले आहेत.

Leave a Reply