बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नगरसेवकाने केला गोळीबार

बीड : २५ फेब्रुवारी – बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रजिस्ट्री ऑफिसमध्ये एका नगरसेवकानं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं दोघांना काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत, दोघांवर गोळीबार केला आहे. या दुर्दैवी घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबाराच्या या थरारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये काही जणांमध्ये जमिनीचा वाद सुरू होता. मोठा आवाजात बाचाबाची सुरू असल्याने अनेक आसपासच्या नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती. जमिनीचा वाद विकोपाला गेल्यानंतर बीडमधील एका नगरसेवकानं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं दोन जणांना बेदम मारहाण केली आहे.
आरोपींनी काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी उपस्थित काही लोकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या नगरसेवकानं आणि त्यांच्या साथीदारांनी सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी या दोघांवर गोळीबार केला आहे. या थरारक घटनेत सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली असून खोलवर जखम झाली आहे. तर फारुक सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेली असून तेही या घटनेत जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्व पुरावे गोळा केले आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली आहे. दोन्ही जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यलयातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply