रशियाची युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरु, युक्रेनमधील अनेक शहरांत केले बॉम्बहल्ले

नवी दिल्ली : २४ फेब्रुवारी – रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यानंतर युक्रेनमधील अनेक शहरांत बॉम्बहल्ले करण्यात येत आहेत. युक्रेनमधील विविध भागांत भीषण स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाकडून युक्रेनमधील विविध भागांत बॉम्बहल्ले करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान युक्रेनमधील विविध ठिकाणी एअरबेसवर रशियाकडून हल्ला करण्यात येत असल्याचं वृत्त समोर येत आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी सैन्याला कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत आहेत. माहितीनुसार, रशियन सैन्याने सांगितले की, युक्रेनच्या विमानतळावर आणि हवाईतळांवर हल्ला करण्यात आला आहे.
रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव येथे मोठ्या स्फोटांचा आवाज येण्यास सर्वप्रथम सुरुवात झाली. रशियाने केलेल्या या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी म्हटलं, संपूर्ण जगाने एकत्र येत रशियाच्या या हल्ल्याला रोखलं पाहिजे.
रशियाकडून करण्यात येत असलेल्या या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने रशियाचे पाच लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आलेली ही कारवाई पूर्व युक्रेनमध्ये करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
रशियाने युक्रेनमधील दोन गावे केली काबीज
रशियन सैन्याने युक्रेनमधील दोन गावे काबीज केली असल्याचंही मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. भारतीय शेअर बाजारही याला अपवाद नाही. युद्धाच्या धास्तीने गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण आहे. कोरोना संकटानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या मंदीच्या वातावरणाचा फटका बसणार आहे.

Leave a Reply