नवाब मलिकांच्या राजीमान्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलिसांशी वादावादीत घसरली अनिल बोंडे यांची जीभ

अमरावती : २४ फेब्रुवारी – राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल अटक केली आहे. त्यामुळे मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपने आज अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन केले. दरम्यान यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे आणि महिला पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी शाब्दिक बाचाबाची करत असताना मात्र अनिल बोंडे यांची महिला अधिकाऱ्याशी बोलताना जीभ घसरली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी, ही मागणी करण्यात आली. यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात. यावेळी आम्हाला अटक का करता असा संतप्त सवाल अनिल बोंडे यांनी यावेळी विचारला. पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले.
आम्हाला अटक का करता. आम्ही कुणाला शिव्या दिल्या का. तुम्हाला काय दहा-दहा वेळा केसेस लावायच्या एवढेच काम आहे का. तुम्ही पोलिसांची गाडी का बोलावली, असा सवाल अनिल बोंडे यांनी पोलिसांना विचारला. आम्हाला ताब्यात घ्यायचे असेल तर आम्ही आमच्या गाडीने येतो. तुम्ही जास्त काही करू नका, तुम्ही भाजपवाल्यांना त्रास देता, असा आरोपही बोंडे यांनी केला.

Leave a Reply