ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या – राजू शेट्टी यांचा अजित पवारांना टोला

कोल्हापूर : २४ फेब्रुवारी – राज्यात सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणाऱ्या ईडीच्या कारवाय चर्चेचा विषय आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़ न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता ईडी कोणावर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे.
शेतीला सलग १० तास दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. यावेळी महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू. जनतेला लुबाडायचे, त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे, अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर राजू शेट्टी यांनी अजित पवारांना इशारा देत ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या असे म्हटले आहे. राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही- अजित पवार, उपमुख्यमंत्री असे म्हटले आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी, “एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,” असे म्हटले आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावली. मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले.

Leave a Reply