वीज केंद्र परिसरात भ्रमण करणाऱ्या ३ वाघांना जेरबंद करण्याची मोहीम वनविभाकडून सुरु

चंद्रपूर : २३ फेब्रुवारी – महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात सोमवारी रात्री उशिरा वन खात्याला यश आले. जेरबंद वाघाला गोरेवाडा नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, वीज केंद्र परिसरात भ्रमण करणाऱ्या एक मादी व दोन नर अशा ३ वाघांना पकडण्याची मोहीम वन खात्याच्या वतीने सुरू आहे. तर एक वाघ आज संच क्रमांक ८ व ९ परिसरात दिसल्याने खळबळ उडाली आहे. वाघ व बिबटय़ाला जेरबंद करा, या मागणीसाठी आज, मंगळवारी दुर्गापूर, ऊर्जानगरवासीयांनी कडकडीत बंद पाळला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्याने वन विभागावर दबाव वाढला आहे.
वीज केंद्रात कामगाराचा व ऊर्जानगर येथे सोळा वर्षीय युवकाचा बळी घेणाऱ्या वाघ व बिबटय़ाला जेरबंद करण्याची मोहीम वन खात्याच वतीने राबवण्यात येत असतानाच सोमवारी रात्री उशिरा वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे पट्टेदार नर वाघाला बेशुद्धकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. वाघाला जेरबंद करणाऱ्या पथकात ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अजय मराठे, राकेश आहुजा, पवन कुळमेथे, अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल कोरपे, अमोल तिखट, नन्नवरे या पथकाचा समावेश होता. जेरबंद केलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा येथे हलवण्यात येणार आहे.
वीज केंद्रात आज पुन्हा वाघाने दर्शन दिले. त्यामुळे वीज केंद्र परिसरात फिरणाऱ्या तीन वाघांना जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. तर ऊर्जानगरातील बिबटय़ाला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले आहे. तीन वाघ व बिबटय़ाला जेरबंद करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर वनविभागाच्या निषेधार्थ सुरू असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपोषणाची सांगता झाली. दुर्गापूर, नेरी व इतर परिसरातील बिबटय़ांना पकडण्याकरिता पिंजऱ्यांची संख्या वाढवून गस्त सुद्धा वाढविणार असल्याचे मान्य केले. तसेच या दोन्ही क्षेत्रात वन विभागाने अधिकृत कमीत कमी २ चौकी देऊन त्यात २४ तास वन खात्याचे कर्मचारी ठेवावे ही मागणी मान्य केली. दरम्यान, वाघ व बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी ऊर्जानगर, दुर्गापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चात माजी सरपंच श्रीमती मायाताई मून, माजी सरपंच अमोल ठाकरे, ऊर्जानगरच्या माजी सरपंच प्रतिभा खन्नाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अंजय्या मुस्समवार, उपाध्यक्ष दीपक कुंडोजवार, दुर्गापूरच्या सरपंच पूजा मानकर, ऊर्जानगर सरपंच मंजूषा येरगुडे, दुर्गापूरचे उपसरपंच प्रज्योत पुणेकर, ऊर्जानगर उपसरपंच अंकित चिकटे सहभागी झाले होते.

Leave a Reply