जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला, घरही पेटवले

यवतमाळ : २३ फेब्रवारी – उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील एका दाम्पत्यावर ते जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला करून त्यांचे घर पेटवून देण्यात आले. विनायक भोरे व त्यांची पत्नी उर्मिला भोरे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
तरोडा येथे भोरे दाम्पत्य वास्तव्यास आहे. रात्री हे दाम्पत्य घरात असताना सहा ते सात जण तोंडावर कापड बांधून अचानक घरात शिरले व शिवीगाळ करीत तुम्ही जादूटोणा करत असल्याने तुम्हाला जिवे मारून टाकू, असे धमकावत लाठय़ाकाठय़ांनी जबर मारहाण केली. काहींनी डिझेल ओतून त्यांचे घर पेटवून दिले तसेच अंगणातील दुचाकीही पेटवून दिली. या प्रकाराने घाबरलेले भोरे दाम्पत्य हल्लेखोरांच्या तावडीतून घराबाहेर पडले. पंरतु, हल्लेखोरांच्या मारहाणीत ते दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोफाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना प्रथम मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी दोघांनाही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. विनायक भोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले. तर उर्मिला भोरे यांच्यावर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदवले.
त्यांच्या तक्रारीवरून समाधान भुसारे (३०), प्रफुल्ल भुसारे (३५), आकाश धुळे (३०), गोलू धुळे (२५), भगवान धुळे (४५), भीमराव धुळे (४५, सर्व रा. तरोडा) यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. या सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. पोफाळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजीव हाके हे अधिक तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबाबत गावातील नागरिक काहीही बोलायला तयार नाहीत. घटनेस जादूटोण्याचा संशय कारणीभूत आहे की अन्य कारण याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply