अमोल कोल्हेंनी एक कविता पोस्ट करत दिला नवाब मलिकांना पाठिंबा

मुंबई : २३ फेब्रुवारी – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. खासदार अमोल कोल्हेंनी एक कविता पोस्ट करत नवाब मलिकांना पाठिंबा दिला आहे.
भाजपा सत्तेसाठी ईडीचा वापर करत असून कारण नसतानाही मंत्र्यांच्या घरावर धाडी मारल्या जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता भाजपाला पाहवली जात नसल्याने ते नवनवीन कुरापती करत आहेत, असं कोल्हे म्हणाले. शिवाय तपासयंत्रणा या भाजपाच्या झाल्या असून तुमच्या नेत्यांच्या कोणत्याच भानगडी नाहीत का?, असा सवाल केला आहे. तसेच तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले आहे.
अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक येथील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईडीने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते आणि अंडरवर्ल्डशी संबधत कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर मलिकची चौकशी केली जात आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट, भाऊ इक्बाल कासकर आणि छोटा शकीलच्या नातेवाईकासह १० ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. आधीच कारागृहात असलेल्या कासकरला गेल्या आठवड्यात ईडीने अटक केली होती. पारकर यांच्या मुलाचीही ईडीने चौकशी केली होती.

Leave a Reply