बकुळीची फुलं : भाग १५ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

त्या दिवशी शुक्रवार होता. बालविहारच्या श्रुतिकेचं रेकॉर्डींग होतं. आम्ही म्हणजे तिथे तीन भाऊ , दोन बहिणी आणि मी . त्यावेळी पाच रूपये लेखनाचे आणि दहा रुपये सादर करण्याचे मिळायचे . ते पंधरा रूपये आमच्यासाठी खूप होते . त्यात एक-दोन शेजारची मुलं असायची . आम्हाला न्यायला आकाशवाणी ची पांढरी एम्बसेडर यायची .
त्यावेळी संघ शाखा खालच्या मैदानात आणि वरच्या मैदानात भरत होती .संघ कचेरीला मैदानाला लागून खिडक्या होत्या.
द्वितीय सरसंघचालक गुरूजी शाळेत जातांना किंवा येताना दिसायचे ती शाळा आता संपली होती . पण आकाशवाणीची गाडी यायची ती संघ कचेरी जवळ . गुरूजी अनेकदा दिसायचे
. त्यादिवशी मांजर आडवी गेली , मनात विचित्र वाटत होतं .
अकराला रेकॉर्डिंग असलं की गाडी साडेदहाला संघाच्या मैदानात यायची . मी अस्वस्थ होते. . तेवढ्यात गुरूजी येतांना दिसले . तशी येता जाता पाहून ओळख झालीच होती .
काय झालं, काही अडचण ? एवढ्या उन्हात का बसला आहात ?
मी सारं सांगितलं तसं ते म्हणाले
“फोन कर, कचेरीतून”
आणि मी प्रथम संघ कचेरीत पाऊल ठेवलं तेही बिचकतच .
कारण त्यांना आठवत नसलं तरी मला चांगलंच आठवत होतं. लहानपणी गणपतीच्या प्रसादासाठी आणलेला पावभर खजूर मी आणि माझ्या भावांनी खाल्ला होता . दादांनी अशी चोर मुलं घरात नको म्हणून रात्री आरतीच्या वेळी आम्हाला दोघांना घराच्या बाहेर हाकललं होतं . मी फार स्वाभिमानी . भावाचा हात धरून घराबाहेर पडले. आता जायचं कुठे तर संघ कचेरी पर्यंत चालत आलो . शाखा संपली , वातावरणात अंधार होता . पण संघकचेरीच्या खिडक्या प्रकाशल्या होत्या . मैदानाला लागून असलेल्या खिडकीत आम्ही बसलो . .
माझा भाऊ रडायला लागला. मलाही भिती वाटत होती . वाटलं येतीलच दादा शोधायला पण अर्धा तास झाला तरी ते आले नव्हते . मी भावाला वारंवार समजावत होते . पण तो रडतच होता . काय करावं समजत नव्हतं . रात्र क्षणाक्षणानी पुढे सरकत होती . कोणाकडे जावं, घरी जावं का परत ? या विचारात असतानाच गुरूजी आपलं काम आटोपून चार-पाच जणांसह चालत पुढे आले . आणि त्यांनी आम्हाला पाहिलं . मला अनावर झालं होतं . मी रडत सारं सांगितलं . तेव्हा ते माझ्या भावाचा हात धरून निघाले . म्हणाले.
“आपले आई बाबा रागावतात , आपली चुक झाली असते म्हणूनच ना ? चुक झाली म्हणायचं की, पडायचं अंधारात घराबाहेर ?”
मी काही बोलले नाही. गुरूजींच्या मागे मी आणि माझ्या मागे ते चार स्वयंसेवक चालत होते . डॉ. धर्माधिकारी , नंतर वटकांच्या घराजवळ आमचं घर .
आम्हाला गुरूजींसह पाहून अगोदरच मनातून चिंता करत असलेले दादा म्हणाले
” उगाच रागावलो मी . “
” रागावणं चूक नाही. पण इतकं ही रागवू नये की मुलं टोकाचा निर्णय घेतील. “
ते गेले. येताना जातांना गल्लीत टिमटीमते लाईट होते .
आज त्यांनी मला ओळखलं नाही याचा मनापासून आनंद झाला . मी त्यांच्या खोलीत गेले . चार पाच जणं बसले होते . मला संकोच वाटत होता .त्यातल्या एकानी मला विचारलं तसं गुरूजी म्हणाले
” ही लेखिका आहे बरं , जरा अदबीने बोला . नंबर आहे का ?”
मी होकार दिला .
काय विचारू ? काय नाव सांगू ?
” मी शैलजा रामचंद्र फडणवीस”
” बरं तूच बोल”
त्यानंतर अनेकदा मी फोन करायला जात होते. आता मला संकोच वाटत नव्हता. दर तीन महिन्यांनी बाल विहारचा कार्यक्रम असायचा.
त्या शुक्रवारी रेकॉर्डिंग होतं . फोन केल्यावर गाडी आली . टायर पंक्चर झाल्याचं ड्रायव्हर म्हणाला.
आम्ही दाटीवाटीने आठ जणं गाडीत बसलो . स्वतः ची सायकल नव्हती. पण सरकारी बस आमची होती , ही पांढरी एम्बसेडर आमची होती . काय थाटात बसत होतो आम्ही ..
त्यादिवशी आम्ही गाडीत बसलो. मी माझी तीन भावांनंतरची बहिण आणि त्यानंतरची बहिण आणि दोन मुलं शेजारची.
आकाशवाणी वर आज माझी श्रृतिका होती श्रियाळ चांगुणा यांच्या शिवभक्ती ची.
शिवशंकर त्यांच्या भक्तीची परीक्षा घ्यायला पृथ्वीवर येतात आणि श्रियाळकडे जातात . चांगुणा त्यांची हरप्रकारे सेवा करते .
पण श्रियाळला ते म्हणतात
” तुझ्या पुत्राला उखळात कुटून मला द्यावं ” आज खूप विचित्र वाटतं . देव इतक्या क्रूरपणे परीक्षा घेणारा राक्षस तर नव्हता , अशी कशी परीक्षा त्याने घ्यावी ? त्यावेळी मी ही कथा का निवडली कळलं नाही . आणि हेच आजसुद्धा मला वाटतंच. शिवशंकर पुढे म्हणतात
” चांगुणाला सांग , बाळाला कुटतांना रडू नकोस , त्याच्यासाठी अंगाई गीत गा”
तशी मी फर्स्ट इयरला नापास घोषित झाल्याने एसीएस गर्ल्स स्कूल मधे टीचर होते.
ह्या लहान मुलांवर ह्या कथेचा काय परिणाम होईल हे मी विचारात घ्यायला नक्कीच हवं होतं .
माझी लहान बहिण म्हणजे चांगुणाचा मुलगा आणि तिच्या वरची म्हणजे माझी बहिण पण चांगुणाचा रोल करणारी .चांगुणा आणि तिच्या मुलाचा संवाद मग तिने त्याला उचलून उखळात टाकणं आणि तिने त्याला अंगाई गाणं . हे सारं व्यवस्थित झालं . शिवशंकर प्रसन्न होऊन
त्यांना मुलगा परत करून खुप आशिर्वाद देतात कथा संपली. रेकॉर्डिंग ही संपलं. आम्ही बाहेर आलो आणि माझ्या छोट्या बहिणीचं , जी मुलगा झाली होती तिचं इतकं अधिक कौतुक झालं होतं की, घरी जाऊन तिची द्रुष्ट काढायला सांगितलं.
घरी आली तर ती थकल्यासारखी दिसत होती . दिवस उन्हाळ्याचे होते. तसं तर उन्हात थांबलो येतानाही गाडीतून उतरल्यावर ऊनच होतं . आईनी कांद्याचा रस सर्वांच्या हातापायाला लावला .
दुस-या दिवशी सर्व ठीक होते .
दुस-या दिवशीची संध्याकाळ . लहान बहिणीला ताप आला . .
आईनी तिच्या हातापायाला कांद्याचा रस लावला . कडूलिंबाची पानं उकळून काढा दिला . . बरं वाटलं तिला . रात्री झोपताना ती म्हणाली ” माझ्यासाठी गुलाबी रंगाचं छान फुलांचं कापड आण . मला खुप आवडतं. नक्की आणायचं हं . “
शनिवार संपला. रविवार उजाडला. तिचा ताप चढत होता , उतरत होता .पण सरकारी दवाखाना बंद असल्याने औषध नव्हतं , प्रायव्हेट डॉक्टर जावं तर घरात पैसे नव्हते . सोमवारी रिझर्व बॅंकेत जाऊन मी चेक वठवणार होते.
संध्याकाळ झाली .
आई आणि दादा उद्याची वाट पहात होते घरगुती उपचार सुरू होते.
सोमवार उजाडला . तिचा ताप कमी झाला होता . मी तिच्यावरच्या माझ्या बहिणीला घेऊन महाल ते बर्डी आणि बर्डी वरून
दुस-या बसने रिझर्व्ह बॅंकेत जाणार होतो . उमलती फुलं सुकावं तशी माझी लहान बहिण कोमेजली होती. मी निघतांना म्हणाले तिच्या कानात, ” मी नक्की आणीन गुलाबी रंगाचं कापड मग तुला छान फ्रॉक घालून शाळेत जाता येईल . आईला सांगू नकोस काही “
ती हसली छानपैकी. आम्ही दोघी निघालो चेकचे पंधरा रूपये घेतले .
आणि बडकस चौकाजवळच्या दुकानात जाऊन अगदी पहिल्यांदा गुलाबी रंगावर लाल गुलाबाची फुलं आणि हिरवी कंच पानं असलेलं पाच रूपयांची दीड मीटर कापड घेतलं .
आणि कमालीच्या आनंदाने आम्ही दोघी तिस-या मजल्यावर गेलो . तर खालच्या मजल्यावरील माणसं गर्दी करून उभी होती . आम्ही त्यांना बाजूला करून आत गेलो तर माझी बहिण ह्या जगात नव्हती .
अचानक ताप चढून मस्तकात गेला असं काहीसं कळलं . डॉक्टर तर नव्हतेच . तिला सरकारी हॉस्पिटल चं ताप सांगून एक गुलाबी रंगाचं औषध आणलं होतं ते तसंच होतं .
माझी बहिण आम्हाला सोडून गेली होती . तिच्यासाठी आणलेल्या गुलाबी रंगाच्या कापडात तिला गुंडाळलं .
संपलं होतं सारं . श्रियाळ चांगुणाचं बाळ झालेली माझी बहिण तशीच गेली होती , तिला आणलेलं गुलाबी रंगाचं कापड ही न पाहता.
आणि तिची द्रुष्ट काढायची राहूनच गेली होती……………. .

शुभांगी भडभडे

Leave a Reply