पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी हल्लाबोल मोर्च्यात जोरदार राडा, ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांना धक्काबुक्की

पुणे : २२ फेब्रुवारी – काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल कडून आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आज पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस ओबीसी सेलने हल्लाबोल मोर्चा काढला. मात्र, या मोर्चात जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं.
पुण्यात ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर काळा झेंडा दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील यांना धक्काबुक्की करत मारहाण सुद्धा केली.
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. ढोले पाटील ओबीसीना आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहेत. त्यामुळे ते सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी आले. मात्र, त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ते पाहून संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोले पाटील यांना धक्काबुक्की केली.
काँग्रेस शहराध्यक्ष, काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष या मोर्चात सहभागी झाले होते. त्याचवेळी अचानक मंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील याला मारहाण सुद्धा केली. मृणाल ढोले पाटील हा भाजपचा पदाधिकारी असल्याचंही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply