नेत्यांमध्ये सुरू असलेलं भांडण थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा – रामदास आठवले

औरंगाबाद : २२ फेब्रुवारी – “शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये कुत्रा आणि मांजरीप्रमाणे भांडण सुरू आहे. पण कोण कुत्रा आणि कोण मांजर आहे, हे पाहणं महत्वाचं आहे, असं आठवले म्हणाले. तसेच नेत्यांमध्ये सुरू असलेलं हे भांडण थांबवावं, अशी आमची इच्छा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना थोडी समज द्यावी. संजय राऊतांनी अपशब्द आणि शिवराळ भाषा न वापरता आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे,” असं आठवले म्हणाले. ते औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपाने एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. आधी नेत्यांची ही भांडणं मिटली की नंतर शिवसेना आणि भाजपामधील भांडणं मिटवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असं आठवले म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत राहिली तर त्यांचं मोठं नुकसान होईल. आम्हाला सत्तेची कोणतीही गरज नाही. परंतु शिवसेना जर अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तयार झाली तर भाजपा देखील त्यासाठी तयार होईल, पण सध्या असं कोणतंही चित्र दिसत नाही,” असं आठवलेंनी सांगितलं.

Leave a Reply