शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करणाऱ्या भाजप आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल

बुलढाणा : २१ फेब्रुवारी – भारतीय जनता पक्षाच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी शिवजयंतीनिमित्त चिखली शहरातून भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. पण कोरोना संसर्गाच्या काळात अशी रॅली काढणं श्वेता महाले यांना महागात पडलं आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह ३५ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता श्वेता महाले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवजयंतीनिमित्त भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. मात्र कोरोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचं सांगत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विनापरवाना मोटारसायकल व स्कुटी रॅली काढून जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे जमावबंदी आदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या कोरोना नियमावलीचं उल्लंघन केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. यामध्ये 30 ते 35 स्कुटी चालक महिलांचा समावेश आहे. या सर्व महिलांवर कलम 188, 269, 270 आयपीसी यासह कलम 3 साथरोग प्रतिबंधक अधिनियम, 135 अंतर्गत ही कारवाई चिखली पोलिसांनी केली आहे. या पोलीस कारवाईचा शहरात निषेध व्यक्त करण्यात येत असून महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. अनेक महिलांनी चिखली शहरातील मुख्य शिवाजी चौकात पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन केलं आहे.
या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना, महिला आमदार श्वेता महाले यांनी म्हटलं की, ‘आखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा आणि अभिवादन करण्यासाठी चिखली शहरातून जिजाऊच्या लेकींनी शांततेच्या मार्गाने बाइक रॅली काढली होती. यामुळे जर त्या गुन्हेगार ठरत असतील, तर असे गुन्हे वारंवार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला कोणी गुन्हेगार म्हटलं तरी त्याची आम्हाला तमा नाही!’

Leave a Reply