महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही – मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया

मुंबई : २१ फेब्रुवारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव रविवारी मुंबईत पोहोचले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राव यांनी सध्या भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली असून, बिगरभाजप आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार यांची त्यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान त्यांच्या या भेटीवर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.
नारायण राणे यांनी ट्वीट करत या भेटीवर टीका करताना सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही असा टोला लगावला आहे. तसंच यापुर्वी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ घोषणा देणाऱ्या शिवसेनेने भूमिका बदलण्यावरुनही टीका केली आहे. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही असं ते म्हणाले आहेत.
“सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती. हटाव लुंगी, बजाव पुंगी! आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन! तुम्ही (तेलंगणा) आम्ही (शिवसेना) भाऊ भाऊ. मिळेल ते मिळून खाऊ!,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.
महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत,” अशी आठवण नारायण राणेंनी यावेळी करुन दिली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Leave a Reply