दुचाकीचोरीच्या आरोपात उच्चशिक्षित तरुणीला अटक

नागपूर : २१ फेब्रुवारी – नागपूरमधील सीताबर्डी परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपीची माहिती मिळताच पोलिसही चक्रावून गेले. एक उच्चशिक्षित तरुणी दुचाकी चोरी करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या तरुणीने आतापर्यंत तीन दुचाकींची चोरी केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यात तरुणीसोबत आणखी कुणी सहभागी आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र सुशिक्षित असूनही ही तरुणी हे काम का करीत होती हे अद्याप कळू शकले नाही.
नागपूरच्या सीताबर्डी मार्केटचा परिसर म्हणजे अतिशय गजबजलेला परिसर. याच गर्दीच्या परिसरातून ही 21 वर्षीय तरुणी दुचाकी चोरायची. डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने ती दुचाकी घेऊन पसार व्हायची. आतापर्यंत तिने अशा प्रकारे तीन दुचाकी चोरुन नेल्या आहेत. या परिसरातून वाहन चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. यामुळे पोलिसांनी या परिसरात लक्ष केंद्रित केले होते. बर्डीच्या मेट्रो स्टेशनजवळून एक दुचाकी चोरी झाली होती. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेज पोलिसांना एक संशयित तरुणी आढळली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. ही तरुणी आपले शौक पूर्ण करण्यासाठी की पैसे कमवण्यासाठी ही चोरी करीत होती याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.

Leave a Reply