जामीन मिळताच हिंदुस्थानी भाऊला नागपूर पोलिसांनी पाठवली नोटीस, २२ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

नागपूर : १८ फेब्रुवारी – हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी हिंदुस्तानी भाऊला जामीन मिळाला. मात्र, हा जामीन मिळताच आता नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ हाजिर हो… असे आदेश काढले आहेत.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केलं होतं. या प्रकरणात धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्तानी भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तशाच प्रकारे नागपूर येथेही विकास पाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आता नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला नोटीस बजावली आहे.
नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ याला नोटीस बजावली असून २२ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चिथावणी देत आंदोलन घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
विकास पाठक यानेच ३० जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितला. एवढंच नाहीतर वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याची सूचना सुद्धा केली होती.

Leave a Reply