मेमरीतला डेटा – अविनाश पाठक

जल्लोष आणीबाणी संपविल्याचा

तीन-चार दिवसांपूर्वी देशात आणीबाणी लागल्याला ४६ वर्षे पूर्ण झाल्याची बातमी वाचायला मिळाली. या निमित्याने विविध व्यक्तींच्या विविध प्रतिक्रियाही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या. यावेळी मलाही त्या काळातल्या आठवणी जाग्या करता आल्या.
या आठवणी जागवताना माझे मन गेले ते २० मार्च १९७७च्या रात्री. २६ जून १९७५ला देशात आणीबाणी लागली होती. ही सुमारे २१ महिने राहिली. आणीबाणीला १९ महिने झाले असताना, आणीबाणी लादणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे आणीबाणी अंशत: शिथील करण्यात आली होती, मात्र, निर्बंध होतेच.
ठरल्यानुसार, निवडणुका आटोपल्या. १९ मार्चला शेवटचे मतदान आटोपले. २० मार्चच्या सकाळी मतमोजणी सुरू झाली. संध्याकाळी पाचनंतर ठिकठिकाणच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी बातम्यांसाठी आकाशवाणी आणि दूरदर्शन ही दोन सरकारी माध्यमेच कार्यरत होती. देशात ज्या प्रमुख चार वृत्तसंस्था होत्या, त्यांचेही इंदिरा सरकारने राष्ट्रीयकरण करुन संपूर्ण देशात सरकारच्या अधिपत्याखाली एकच वृत्तसंस्था कार्यरत ठेवली होती. परिणामी, सुरुवातीला स्पष्ट माहिती बाहेर येत नव्हती, मात्र, हळूहळू बातम्या बाहेर झिरपणे सुरू झाले होते. देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसची पिछेहाट होते आहे, अशा बातम्या बाहेर येत होत्या.
त्यावेळी मी दूरदर्शनचा वृत्तछायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. परिणामी, मी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीचे वृत्तचित्रण करत होतो. नागपुरातील दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच आघाडीवर होती, मात्र, तिथेही देशभरात काँग्रेसच्या होत असलेल्या पिछेहाटीबद्दल बातम्या येण्यास सुरुवात झाली होती.
रात्री 10च्या सुमारास मी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडलो. घरी येताना रस्त्यात ठिकठिकाणी जल्लोष सुरू असलेला दिसत होता. घरी येऊन रेडिओवर बातम्या घेतल्या, तेव्हा, काँग्रेसच्या पराभवाबद्दल सांगणे सुरू झाले होते.
रात्री जेवण आटोपून मी झोपलो, तेव्हा १२ वाजत होते. त्यावेळी नागपुरात उन्हाळ्याच्या दिवसांत अंगणात झोपण्याची पद्धत होती. त्यादिवशी मीही अंगणातच झोपलो. दिवसभराच्या धावपळीने पटकन झोप लागली. मध्यरात्री अचानक कोलाहल आणि गोंधळाने जाग आली. उठून बघतो, तो शेजार-पाजारची सर्व घरे तर, जागी होतीच, पण माझ्या घरातील मंडळीही जागीच होती. रस्त्याने जल्लोष करत तरुणाईचे घोळके चालले होते. फटाके फोडले जात होते. काय होतेय, ते क्षणभर कळलंच नाही. हाताचे घड्याळ बघितले तर, पहाटेचे दोन वाजत होते.
इतक्यात घरातून सर्व मंडळी आरडाओरड करतच बाहेर आली. काय झाले, असे मी विचारताच, अरे! इंदिरा गांधी ८० हजारांनी पडल्या आहेत, असे मला सांगण्यात आले. घरातली आणि शेजारची सर्वच मंडळी अक्षरश: चेकाळलेली होती. माझा विश्वास न बसल्यामुळे मी उठून घरात गेलो. रेडिओवर बातमी देणारा जोरजोराने देशाच्या पंतप्रधानांना आपल्या मतदारसंघातच पराभव पत्करावा लागल्याचे सांगत होता.
बाहेर येऊन बघतो, तो सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. अर्थात, त्यामागे कारणंही तशीच होती. १९ महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात सत्ताधारी पक्ष आणि सरकारी यंत्रणेने प्रचंड अतिरेक केले होते. निवडणूक जाहीर झाल्यावर देशभरात ज्या सभा झाल्या आणि एकूणच निवडणूक प्रचार झाला, त्यांत जनसामान्यांचा असलेला उत्स्फूर्त सहभाग जनमानसातील असंतोष जाणवून देणारा होता. या सर्व अतिरेकाला इंदिराजीच कारणीभूत आहेत, असा जनमानसाचा समज झाला होता. त्यामुळे इंदिराजींचा पराभव हा सर्वांनाच सुखद धक्का होता.
इतक्या गोंधळात आता पुन्हा झोपणे शक्यच नव्हते. मी बाहेर आलो. थोडा वेळ माहोल बघितला आणि बाहेर फिरुन येण्याचा निर्णय घेतला. कपडे बदलले आणि रात्रीच्या या गोंधळात स्कूटर कशाला न्यायची म्हणून सायकल घेऊनच मी निघालो. लक्ष्मीनगर चौकात सुमारे दोन हजार नागरिक एकत्र जमलेले दिसले. नसबंदी के तीन दलाल, इंदिरा-संजय-बन्सीलाल, या घोषणा जोरजोरात दिल्या जात होत्या. इंदिराजींबरोबर संजय गांधी, बन्सीलाल, हरिभाऊ गोखले, विद्याचरण शुक्ला हे सर्वच इंदिराजींचे विश्वासू सहकारी पराभूत झाले होते. त्यामुळे सर्वांच्याच नावाचा शिमगा सुरू होता. तिथून पुढे निघालो तर, मध्यरात्रीच ढोलताशे वाजवत मिरवणुका निघालेल्या दिसत होत्या. सोबत मिठाईदेखील वाटली जात होती. शंकरनगर चौकातही हाच माहोल होता.
थोडा पुढे लक्ष्मीभुवन चौकात पोहचलो, तर, तिथे अक्षरश: दिवाळी सुरू होती. लक्ष्मीभुवन चौकात असलेल्या मोकळ्या प्लॉटवर मंडप टाकून त्यावेळच्या जनता पक्षाचे प्रमुख प्रचार कार्यालय उघडले होते. निवडणूक प्रचारादरम्यान या चौकात मोठ-मोठ्या सभा झाल्या होत्या. त्या चौकात विजयाचा जल्लोष सुरू होता. चौकात थोडी पुढे असलेली नंद भंडार आणि राज भंडार ही दोन्ही मिठाईची दुकाने मध्यरात्रीदेखील उघडी होती. तिथून भरभरून मिठाई नेली जात होती. मिठाई बनवून दोघांकडलेही कारागिर अक्षरश: थकून गेले होते. पहाटे चार वाजता दोघांनीही आता मिठाई बनवायला काही मालच शिल्लक राहिला नाही, असे सांगून सगळ्यांना हात जोडून माफी मागायला सुरुवात केली होती.
चौकात पोहचलो तर, शेकडो नागरिकांनी ढोलताशांच्या तालावर नाचणे सुरू केलेले होते. या जल्लोषाचे नेतृत्व स्व. गंगाधरराव फडणवीस (माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील) यांच्याकडे होते. वयोवृद्ध नेत्या सुमतीबाई सुकळीकर यादेखील मध्यरात्री तिथे पोहचल्या होत्या.
जल्लोष बघत-बघत, फिरता-फिरता, उजाडलं केव्हा ते कळलंच नाही. मग सकाळी घरी पोहचलो आणि चहा घेत असतानाच वृत्तपत्रे यायला सुरुवात झाली. तरुण-भारतात इंदिराजी पराभूत, अशा शीर्षकाची प्रचंड मोठी बॅनर लाईन दिली होती. काँग्रेसचे म्हणून ओळखल्या जाणार्या लोकमतनेही काँग्रेसवर वज्राघात, इंदिराजी पराभूत, अशी हेडलाईन दिली होती.
२१ मार्चला दिवसभर हीच चर्चा होती. देशभरात सुरू असलेल्या जल्लोषाच्या बातम्या येत होत्या. दुपारी एकच्या सुमारास केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होऊन आणीबाणी उठवल्याची आणि मिसा कायद्याखाली सर्व कैदी लगेचच सोडण्याची घोषणा केल्याची बातमी आली. तोवर नागपुरातीलही सर्व राजकैदी सोडणार असल्याचे निरोप मिळाले.
दुपारी तीनच्या सुमारास नागपूरच्या सेंट्रल जेल परिसरात पोहचलो, तर, तिथे प्रचंड गर्दी गोळा झाली होती. तिथेही ढोलताशांचा गजर सुरू होता. तितक्यात, नाशिक तुरुंगात स्थानबद्ध असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचीही सुटका झाल्याची बातमी आली. त्यावेळी राष्ट्रभक्ती तेरा नाम-आरएसएस-आरएसएस- आरएसएस या घोषणांनी परिसर गर्जून उठला होता.
दुपारी चारपासून राजकैदी बाहेर यायला सुरुवात झाली. त्यावेळी उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले होते. जेलके ताले टूट गये-राजबंदी छूट गये या घोषणांनी परिसरात जल्लोष करायला सुरुवात झाली. एक-एक करत सर्व राजकैदी बाहेर येत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांचा जल्लोष सुरूच होता. हा जल्लोष पुढे अनेक दिवस नागपूरकरांनी अनुभवला, देशवासीयांनीही अनुभवला होता.
या घटनेला ४६ वर्षे झाली. त्यावेळी मी २२ वर्षांचा होतो, मात्र, आजही या सर्व आठवणी अगदी ताज्या आहेत.

अविनाश पाठक

Leave a Reply