बकुळीची फुलं : भाग १४ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

“काय मी नापास झाले ? कसं शक्य आहे ? मला पासिंग मार्कही मिळाले नाहीत? असं कसं शक्य आहे.” विचार करून थकले होते पण मला मानावं लागलं होतं.
एल. एल. डी. कॉलेजमध्ये फर्स्ट इयर ला असतांनाच मी चक्क नापास झाले होते . मनाच्या विविध कोप-यातून मी मला तपासून पाहिलं . मी नापास होऊच शकत नव्हते . पण झालं होतं ते खरंच होतं .
दादांना म्हटलं ,” मी नापास होऊच शकत नाही.तुम्ही एकदा दहा रूपये भरून चेक करून पहा “
ते सहज म्हणाले , “स्कॉलरशीप तर गेली ना ! आता चेक केलं आणि एखाद्या विषयात तू नापास झाली असशील तरी तुला परीक्षा तर द्यावीच लागेल . त्यासाठी फी भरावी लागेल . महिने वाया जातील . त्यापेक्षा तू नविन काही कर . हिंदीच्या परीक्षा दे . टीचर म्हणून तू उद्या काम करशील .जीवनात साध्या वाटा नसतात आपणच मार्ग बदलून चालायचं असतं”
माझा नाईलाज झाला तरी नविन संधी आली होती . त्यावेळी हिंदी विषय सर्वच कामकाजासाठी आवश्यक होता. मी एका मागोमाग एक परीक्षा देत गेले . आणि प्राविण्यासह पास होत गेले. . वर्ध्याची राष्ट्रभाषा रत्न आणि अलाहाबाद ची साहित्य रत्नही उत्तम रितीने पास झाले . आणि मला काही महिने ऑफीसमधल्या लोकांचे क्लास घ्यायची संधी मिळाली .
मला स्वतः बद्दल नेहमीच आश्चर्य वाटत आलंय, संधी गेली म्हणून दु:ख क्षणभर करावं ना करावं तोच दुसरी संधी मिळते. आणि काहीच महिन्यांनी मला हिंदी टीचरची वनिता विकास विद्यालयात , महाल मधल्या केळीबाबरोडवर नोकरी मिळाली . त्यापूर्वी काही महिने मी गांधी बागच्या प्रकाश हायस्कूल तर एक वर्ष जरिपटक्याच्या एस सी एस गर्ल्स हायस्कूल मधे नोकरी मिळाली .
एस सी एस गर्ल्स हायस्कूल चे दिवस कठीण होते ते जाण्याच्या द्रृष्टीने . महाल ते गांधीबाग एक बस मग गांधी बाग ते जरीपटका दुसरी बस .पाऊस आणि थंडीचे दिवस अंधार पांघरून असायचे अशावेळी बसही वेळेवर यायची नाही. . वर्ष कसं गेलं ते आजही आठवून शहारा येतो अंगावर . पण जिथे पाऊल टाकलं मला आनंदच मिळत गेला. एस सी एस गर्ल्स स्कूल मधे एक ख्रिश्चन मैत्रिण मिळाली . मी कट्टर हिंदू तर ती कट्टर ख्रिश्चन . . ती इंग्रजी तर मी मराठी आणि हिंदी शिकवत होतो.
मैत्री व्हायला वेळ लागला पण पुढची अनेक वर्ष ती माझ्या सोबत होती .
येशू ख्रिस्त तिने मला समजावून आणि चर्च मधे नेऊन दाखवला . मीही काही कमी नव्हतेच. मी तिला काहीही न सांगता रोज एक कॉमन गोष्टींचा तास मागून घेतला . आणि महाभारत , रामायण , कबीर , तुलसीदास सांगायला सुरूवात केली .
एक दिवस ती मला म्हणाली,
तुमच्याकडे किती देव . काही अर्थ आहे का ? त्या प्रतिमा ख-या थोड्याच आहेत. .”
मला मनातून राग राग आला होता. पण शांतपणे म्हणाले.
“तुमच्या येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर किती लोकांनी भार टाकलाय . बिचारा अगतिक झालाय . आमच्याकडे गणपती बुद्धी दाता आहे , शिवशंकर सिद्धीदाता आहे , श्री विष्णू पालकत्व घेतो विश्वाचं . त्यांची पत्नी लक्ष्मी संपत्ती दान करते . सूर्य प्रकाशतो , चंद्र थकलेल्यांना विश्रांती देतो , वायुदेव …. “पुरे पुरे ” ती म्हणाली .
तरी मी म्हटलंच
.” आमच्या देवांवर आमची नितांत श्रद्धा आहे. म्हणून कधीकाळी मानव रूपात आलेल्या प्रतिमा आम्ही मनात , मंदिरात जपतो . एकाही देवाचा कधीही मानवाने छळ करून सूळावर टांगलं नाही” माझं ती शांतपणे ऐकत राहिली.
मग हलकेच म्हणाली
“मलाही हे सारं थोडं थोडं सांगशील ?”
“हो सांगीन .”
मग ती आमच्याकडे गौरी गणपतीला सणावारी येत राहिली . मीही मग ख्रिश्चन धर्माचं सार जाणून घेतलं , बायबल वाचलं.
लक्षात आलं .सर्वच धर्मग्रंथात जीवनाचं सुंदर जीवन तत्वज्ञान सांगितलं आहे . सफल , सुंदर जगण्याचा कर्ममार्ग सांगितला आहे . मनाचं पावित्र्य सांगितलं आहे. हा हा अनुभव मला नविन होता.
नंतर मात्र अनेक वर्ष आमची मैत्री कायम होती . ती मुंबई ला गेली आणि अधून मधून बोलतांना मैत्री संपली.
मी नापास होणारच नव्हते पण झाले होते . पण त्यामुळे मला अनेक विद्यार्थी , शिक्षक , यांचे स्वभाव कळत गेले . जीवनाचं शिक्षण सहज मिळत गेलं .
शिकणार तर मी होतेच स्वबळावर . पण अगोदर अनुभव संपन्न झाले, कदाचित कॉलेजमध्ये असे अनुभवाचे पाठ मिळाले नसते . होतं ते भल्यासाठीच.

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply