पंतप्रधानांनी दिली संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला भेट, नागरिकांसोबत घेतला कीर्तनात सहभाग

नवी दिल्ली : १६ फेब्रुवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात दर्शन घेतलं. नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.गुरु रविदास जयंती उत्सव हा पंजाबमधील अनसूचित जाती प्रवर्गातील मागासवर्गीय बांधवांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के समाज संत रविदास यांच्या विचारांना मानतो. संत रविदास जयंतीमुळं पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट करुन रविदास जयंतीनिमित्त करोल बागेतील मंदिरात उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास जंयतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शबद किर्तनात सहभाग घेतला. नवी दिल्ली येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरातील आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी झाले. यावेळी उपस्थित महिला आणि भाविकांची विचारपूस देखील मोदी यांनी केली.
उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड सोबत पंजाबमध्ये देखील विधानसभा निवडणूक जाहीर झालीय. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 14 फेब्रुवारीला मतदान होणार होतं. मात्र, काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीनं निवडणूक आयोगाकडे मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं पंजाबमध्ये मतदान 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचं जाहीर केलं होतं. पंजाबच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजची नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply