बकुळीची फुलं : भाग १३ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

“अगं भाजी आणायला जातेस ना की, मी जाऊ? आईचा स्वर कधी चढलेला नसायचा . पण तिचा “की ,मी जाऊ ” ह्या शब्दांनी नेहमीच उठणं भाग पडायचं . बाबुराव अर्नाळकरांची कादंबरी मी वाचत होते . पुस्तक वाचतांना एरवी कुणी हाक मारली तरी मी ऐकतच नव्हते . त्यातून रहस्यकथा . कादंबरीतला संशोधक मेंदू करवंटीतलं खोबरं खरवडून काढावं तसा काढत होता . त्यात तो काही रसायन भरणार होता . तेवढ्यात आई हातात पिशवी घेऊन उभी . नाईलाजाने पुस्तक आपटलं आणि रागारागाने मी पिशवी पैसे घेऊन निघाले .
आमचं घर तिस-या मजल्यावर . तिथून दोन सिमेंटच्या पाय-या उतरल्या की मग दहा लांब रूंद लाकडी पाय-या . मग दुसरा मजला थोडं चालत गेलं की खाली जायला सिमेंटच्या पाय-या.
तशा त्या दहा लाकडी पाय-या आता डोळ्यासमोर आल्यावर भिती वाटावी अशाच होत्या. पायरीच्या दोन्ही बाजूला कठडे नव्हते की बार लागलेले नव्हते.कसं बेधडक जात होतो कुणास ठाऊक. त्या जिन्याच्या वरच्या पाय-यावरून सरळ अंगण दिसायचं . “सांभाळून जा” असं सांगितलं जायचं .
मी रागातच निघाले होते . त्यात त्यावेळी कॉलेज मधे जायचं म्हणून उंच टाचा असलेली नविन चप्पल घेतली होती .
वरच्या दोन सिमेंटच्या पाय-या उतरल्या आणि लाकडाच्या पायरीवर तसा सरावानी पाय ठेवला . आणि पाऊलच वाकडं पडलं . मी दुस-या मजल्याच्या कठड्या वरून तिथलं सारवणाचं शेणाचं भांडं घेत त्याच्यासह खाली अंगणात पडले.
आई खिडकीतून पहात होती मी गेले की नाही ते . मी पडल्याचे लक्षात येताच माझ्या भावासह दडदडत खाली आली . मी निपचित पडले होते . तिथे सहा भाडेकरी होते . ते ही आले . माझ्या तोंडावर पाणी मारलं जातं होतं . आणि मी मात्र त्या संशोधकाने खरवडलेला मेंदू पहात होते. आणि क्षणात मी माझ्या हातांनी डोकं धरलं . मी नेहमी सारखीच होते . मी उठून बसले. हात पाय, साडी शेणाच्या पाण्याने रंगली होती . थोडं खरचटलं होतं . पडल्यामुळे नीट उठता येत नव्हतं. . पण जीवंत होते , माझा मेंदू ही जागेवर होता याचा मला आनंद होता . कुठेही , काहीही झालेलं नव्हतं.
मला धरून वर आणलं . गादीवर झोपवलं.
आई व्याकुळ झाली होती . भाऊ घाबरले होते . मी मजेत होते .
आई म्हणाली,
“तुला आठवतं तुला देवी आल्या होत्या. त्यातून पूर्णपणे वाचलीत . नंतर चौथीतली ट्रीप आठवते एलिफंटाची?”
आईने विचारताच मला आमच्या शाळेची एलिफंटा केव्हजला गेलेली ट्रीप आठवली. . आईच्याच शाळेत मी . माझ्या शाळेत आई . सातवी आठवी ची ट्रीप होती . मी चौथीत होते. माझे दादा घरी असल्याने माझ्यापेक्षा तीन भाऊ घरीच होते मी आईबरोबर गेले होते , आणि तीही साडी नेसून.
खाली समुद्र , वर जवळ जवळ पिलर असलेला नावे पर्यंत जाण्याचा रस्ता , पंधरा वीस पावलांचा. सकाळी मी अगदी बरोबर पाय जपून ठेवत , साडीला आणि मला सांभाळत नावेत नावाड्याचा हात धरून उतरले होते . माझ्या साडीच्या घोळाकडे पहात तो हसला. मी धावत नावेतून पुढे उतरले . दिवस मजेत संपला.
संध्याकाळ व्हायची होती पण नावाडी आईला सांगत होता
” बाई, समुद्राला भरती आहे,
आज पोर्णिमा आहे , लवकर चला परतीला. ” सारेच घाईने निघाले तरी आवरताना संध्याकाळ. समुद्रात उतरली. .
मी सर्वात लहान साडी नेसले होते . एलिफंटालाही नावे पर्यंत येताना तसेच जवळजवळ पिलर होते सिमेंटचे . असतील दहा बाराच . दोन्ही बाजूला कठडा नव्हता . बारा पंधरा पावलावर तर नाव उभी होती. मी पहिलंच पाऊल पिलरवर ठेवलं आणि माझ्या साडीत माझं पाऊल अडकलो आणि मी समुद्रात पडले. एकदम सारे निस्तब्ध झाले . मग कोणीतरी ओरडलं . पाण्याला गती आली होती . मला मी कळतही नव्हते . त्या नावाड्याने पाण्यात उडी मारली तोवर मी वाहात कितीतरी पुढे गेले होते. पण त्यांच्या हाती लागले त्याने मला सुखरूप नावेत आणलं. नाका तोंडातून पाणी काढलं आणि नाव घाईने वल्हवायला सुरूवात केली . समुद्राला भरती आली होती नाव हेलकावे होती. त्याने ती नावं कशीबशी किना-याला आणली. आईने त्याला अधिक पैसे दिले तेव्हा ते नाकारत तो म्हणाला
” बाई तुमची पोरगी काय , माझी पोरगी काय , वाचली ना , तुम्ही सुखरूप आलात ना हेच माझं बक्षिस”
आई म्हणाली,
“तिस-या मजल्यावरून पडून तू वाचलीस , देवीच्या प्रकोपातून आणि समुद्रात पडूनही तू वाचलीस . देवाचे आभार मान . आणि कधीही आयुष्यात असं वागू नकोस की देवाला वाईट वाटेल”
त्यावेळचं ” देवाला वाईट वाटेल ” हे शब्द मला आजही आठवतात. खरंच आईने देवाला किती जवळचं , घरातलं , आपलं करून टाकलं होतं

शुभांगी भडभडे

Leave a Reply