संपादकीय संवाद – सर्जिकल स्ट्राईकवर विरोधकांनी शंका घेणे हास्यास्पद

आज १४ फेब्रुवारी, तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ च्या १४ फेब्रुवारीला उभा देश हादरून जावा अशी घटना घडली होती. काश्मीरच्या पुलवामा शहरात अतिरेक्यांनी केंद्र राखीव पोलीस दलाचे जवान घेऊन जाणारी गाडी अतिरेक्यांनी उडवून दिली होती. यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते, देशाला हा फार मोठा धक्का होता.
अर्थात आपल्या देशानेही या अतिरेकी हल्ल्याचा बदला लगेचच म्हणजे या हल्ल्याच्या १३व्या दिवशीच घेतला आणि या शहिदांना खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केली. पाकव्याप्त काश्मिरातील एका अतिरेक्यांच्या तळावर जाऊन भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला, आणि तिथे मोठ्या संख्येत अतिरेक्यांचा खात्मा केला. उभा देश या बातमीने शहारून उठला होता. प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाला या सर्जिकल स्ट्राईकचा मनोमन अभिमान वाटलं होता.
मात्र आपल्या देशातील काही विरोधी पक्षांना या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शंका वाटत होती. त्यांच्या मते पुढे अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना भुलविण्यासाठी हे सर्जिकल स्ट्राईकचे नाटक केले होते. त्यामुळे त्यांनी लगेच पुरावे मागितले. केंद्र सरकारने आवश्यक ते पुरावे दिलेही, तरीही विरोधाकरिता विरोध करायचा म्हणून विरोधक पुन्हा ठोस पुरावे मागू लागले. आजही त्यांचे पुरते मागणे सुरूच आहे. आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा एकदा पुराव्यांची मागणी केली आहे.
आज ही घटना घडून गेल्यानंतर तीन वर्ष उलटली आहेत, तरीही पुन्हा पुन्हा पुरावे मागणे म्हणजे झाल्या घटनेचे गलिच्छ राजकारण करणे, असाच प्रकार वाटतो. आपल्या देशात विभिन्न राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या विभिन्न विचारधारा आहेत. आणि त्यातून मतभेदही निर्माण होतात. मात्र जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वानीच मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे असते. १९७१ मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले, त्यावेळी लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा देणारा प्रस्ताव पारित केला. त्या प्रस्तावावर बोलतांना तत्कालीन जनसंघाचे लोकसभेतील नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी आता उभा देश म्हणजे एक पक्ष आहे, आणि या पक्षाच्या नेत्या श्रीमती इंदिरा गांधी आहेत, या शब्दात सहकार्याची ग्वाही दिली होती. आता आम्ही पक्षभेद विसरून हे युद्ध जिंकण्यासाठी इंदिराजींच्या पाठीशी उभे आहोत, हा विश्वास त्यांनी दिला होता. त्यावेळी लढाईत नेमके काय झाले, याचे पुरावे कुणीही मागितले नाहीत.
तीच परंपरा आजही देशातील विरोधी पक्षांनी जपावी असे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नाही. याला कारण राजकीय पक्षातील घराणेशाही हे आहे. काँग्रेस पक्षात असलेल्या घराणेशाही मुळे देशाचे नेतृत्व एकाच कुटुंबाकडे म्हणजेच नेहरू गांधी परिवाराकडे राहावे अशी पक्षातील ज्येष्ठांची इच्छा आहे. मात्र सामान्य मतदार या घराणेशाहीला कंटाळला होता, त्यामुळे मतदारांनी २०१४ मध्ये घराणेशाहीला उखडून फेकत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारला स्पष्ट बहुमत दिले. त्यानंतर या सरकारने केलेल्या कामांमुळे पुन्हा २०१९ मध्ये जास्त बहुमत देत याच सरकारला पुन्हा निवडून आणले. त्यामुळेच विरोधकांचा विशेषतः काँग्रेसी मानसिकतेचा या सरकारला विरोध आहे. त्यामुळे अश्या प्रतीच्या हास्यास्पद शंका घेतल्या जातात.
मात्र अश्या प्रकारच्या सर्वोच्च नेतृत्वाबद्दल शंका घेतल्यास जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होते, याचे भान विरोधी पक्षांनी ठेवायला हवे. मात्र ते ठेवत नाहीत, हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. अर्थात विरोधकांनी अश्या कितीही शंका घेतल्या तरी जनता सुजाण आहे, कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा यांचे भान आणि जाण जनतेला आहे. अश्यावेळी विरोधकांच्या या शंका हास्यास्पदच ठरवल्या जातात. विरोधकांनी हे लक्षात घ्यायला हवे, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply