भाजपाची वाइन विक्रीसंदर्भातील भूमिका दुटप्पी – एकनाथ खडसे

मुंबई : १४ फेब्रुवारी – किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याच मुद्द्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाची वाइन विक्रीसंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याचा टोला लगावलाय. भुसावळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाइन विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपावर निशाणा साधला.
वाइन बाबत भाजपा एका राज्यात विरोध करते तर दुसरीकडे स्वागत करत आहे, अशी स्थिती असल्याचं खडसे म्हणालेत. वाइन ही दारू आहे त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे असं सांगण्यात येत असल्याचा उल्लेख करत खडसेंनी भाजपाची सत्ता असणाऱ्या इतर राज्यांचं उदाहरण दिलं.
“मध्यप्रदेशमध्ये मॉलमध्ये बियर विकायला भाजपा सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशात भाजपाला निवडून दिल्यास दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे,” असं खडसे म्हणालेत. तसेच पुढे बोलताना खडसेंनी भाजपाला थेट दुटप्पी भूमिकेवरुन प्रश्न विचारलाय. “वाइनबाबत भाजपाची दुटप्पी भूमिका का?,” असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात मुंबई येथील सदनिकेची नोंद न केल्याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोषी ठरवून दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी, “बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार असून वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो याची वाट पाहिली पाहिजे,” असं मत नोंदवलं.

Leave a Reply