महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल

नागपूर : ८ फेब्रुवारी – महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल घेण्यात आली. नितीन गडकरी यांनी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना यासंदर्भात पत्र लिहिले. कोराडी, खापरखेडा वीज प्रकल्पातील फ्लाय अँश प्रक्रियेत पर्यावरणीय नियमांची पूर्तता केली गेली नाही. याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे गडकरी यांनी निर्देश दिलेत. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे यांच्या सादर केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालाची दखल गडकरी यांनी घेतली. सीएफएसडी आणि असर यांनी अभ्यासानंतर तयार केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालानंतर गडकरींनी संबंधितांना पत्र लिहिलंय.
कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रामुळं या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय. या प्रदूषणाचा काय परिणाम झाला, याचा अभ्यास सीएफएसी आणि असर या सामाजिक संस्थांनी केला होता. तेव्हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. या परिसरातील पाणी दूषित झालंय. जनावरसुद्धा असं दूषित पाणी पिण्यास मागेपुढं पाहतात. जमिनीची सुपिकता नष्ट झाली. आधी पिके व्हायची. आता जमीन राखेमुळं प्रदूषित झाली. त्यामुळे पिके काढणे शक्य नाही. जी झाडे लावली जातात, ती राखेखाली दडपली जातात. त्या झाडांची वाढ होत नाही.
दूषित घटक हवेत मिसळल्यानं हवेचा दर्जा घसरला. हवेत कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढलं. श्वास घेण्यास त्रात होत आहे. नागरिकांना श्वसनाशी संबंधित आजार झाले आहेत. विहिरींमधील पाणी दूषित झालंय. ते पिण्यायोग्य राहीलं नाही. या साऱ्या समस्या निर्माण झाल्यामुळं सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. या संदर्भात आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बैठक बोलाविली होती. प्रदूषित गावांचं करायचं काय, असा प्रश्न निर्माण झालाय. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपाय शोधून काढणार आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Reply