बकुळीची फुलं : भाग १२ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

हे पुस्तक वाचलं का? कसं आहे ?” हे प्रश्न पुस्तक घ्यायला येणारे वयस्क वाचक मला सहज विचारत होते.दहावीत , ना.सी.फडके , खांडेकर , य.गो. जोशी ,हरिनारायण आपटे अनंत काणेकर , साने गुरुजी वाचले होते. पण इथे वाचनालयात शेकडो पुस्तकं विविध विषयांवर आधारित होती . आता वाचनालयात काम करणा-या , नुकत्याच दहावी झालेल्या मुलीने इतकी सारी पुस्तकं वाचणं तरी शक्य होतं का ?
एकदा एक तरूण आला , माझ्या पुढून तो कपाटाकडे गेला आणि हवं ते पुस्तक घेतलं आणि वाचनालयाला असलेल्या गच्चीत जाऊन बसला .
त्याने पुस्तकांची नोंदही केली नव्हती. पुस्तकांची जबाबदारी मी आणि एका सिनियर बाईकडे होती . ती मला म्हणाली ,
“काय मूर्ख माणूस आहे . ही काय रीत झाली . पुस्तकांची नोंदही नाही . जा त्याला सांग तसं . एक घेतलं की दोन पुस्तकं घेतली, देवच जाणे !”
असेही वाचक असू शकतात ह्याचा अनुभव आला. मी गेले त्याला विचारायला तसं तो म्हणाला
” सांगा त्या बाईंना मी चोर नाही , जसं पुस्तक घेतलं तसं नेऊन ठेवीन . आणि रोज घेईन , रोज ठेवीन .”
अशा उत्तरानी पुढे त्या बोलल्या नाहीत माझा तर प्रश्नच येत नव्हता . फक्त तो आल्याची , पुस्तक घेतल्याची , पुन्हा ठेवल्याची नकळत मन नोंद करत होतं, हे नंतर कळलं. आता मी पुस्तकं वाचायचा सपाटा लावला . एक दिवस एक गृहस्थ आले त्यांनी विचारलं “गीता रहस्य” असेल ना ? “
मी कॅटलॉग पाहिला . जाडजूड ग्रंथ त्यांच्या हाती सोपवला .ते तिथेच खूर्ची घेऊन बसले .
हातात पुस्तक घेतांना त्यांनी त्या पुस्तकाला नमस्कार केला .
एक तास वाचून त्यांनी ते बंद केलं , पुन्हा नमस्कार केला . मला हे कोडंच होतं. हे देवाधर्माचं पुस्तक असावं असं वाटतं होतं . पण सकाळी घाई असल्याने ना मी त्यांना विचारलं, ना पुस्तक उघडून पाहिलं. . जवळ जवळ हा क्रम चालू होता .ते पुस्तक घरी का नेत नाहीत हे मात्र मी त्यांना विचारलं , ते म्हणाले ,
“मुली ,काही ग्रंथ हे सरस्वतीच्या मंदिरातच वाचावेत. त्यामुळे आनंद मिळतो .”
मला यातलं कळलं नाही , तेव्हा ते म्हणाले
” आपण घरी नेल्यावर कुठेही ठेवतो , कसंही धरून वाचतो . मला वाटतं हा लेखकाचा, म्हणजेच सरस्वतीचा अपमान आहे”
मला कळलं पण उमगलं नाही . एकूण हे गृहस्थ वेगळेच होते . इथे आल्यावर कळली अनेक स्वभावाची माणसं . कधी हसणारी , कधी एवढ्याशा कारणांनी वैतागणारी. , पुस्तक चोरणारी , चोरून वाचणारी , कधी कपाटातून बापाचा माल आहे असं समजणारी तर कधी पुस्तक वाचून त्याला पेपरची कव्हर घालून आणणारी , कधी रेंगाळणारी , कधी पुस्तक घेऊन जातांना घाई करणारी .
त्या गृहस्थाचं “गीतारहस्य” वाचून तो गृहस्थ कृतकृत्य झाल्याचं त्यांच्या चेह-यावर दिसलं .
इतक्या दिवसात मी अनेक पुस्तकं वाचली. त्यामुळे मला आता ” हे पुस्तक कसं आहे” यांचं उत्तर वाचकांना देतांना मला आनंद होत होता . हे सारं अनुभवत असलेले ते गृहस्थ त्यादिवशी म्हणाले,
” तू वाचतेस , म्हणून सांगतो , लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात हा ग्रंथ कसा लिहिला असेल याचाच विचार येतो. कुणाचीही आठवण करून भेटण्याची शक्यता नसतांना इतकं अलिप्त त्यांना कसं राहता आलं ? हा ही विचार येतो . मनाची एकाग्रता किती असावी ? नाहीतर आरती म्हणतांना ही मन सैरावैरा पळत सुटतं दशदिशातून . खरंच ..”
नंतर ते बरेच दिवस आले नाहीत.. काय असतं रोजच टेबलापाशी बसून वाचणारा लक्षात राहतो. तसाच तो गच्चीत बसणारा . एकदा त्याला पुस्तक जागेवर ठेवतांना मी विचारलं
” तुम्ही गच्चीत बसून उमलती नक्षत्र मोजता संध्याकाळी ?”
” हे बघा , मी कवी आहे . मी कवितेचं चिंतन करतो . फार अवघड काम आहे . आणि कवी काही सर्व नसतात एखादाच असतो “
पहिल्यांदाच इतकं उद्धटपणे बोलणा-या त्या तरूणांच्या मला रागच आला. मी घरी येऊन आईला म्हटलं
” आई मला एक कविता आजच्या आज करूनच दे” आई हसली. कविता अशी सहज कशी येईल ? आणि लिही म्हटलं की , लिहीता थोडीच येईल ?”
मी आईला सारी कथा सांगितली.
ती म्हणाली ,” बरं पहाते”
दिवस जात होते . कविता होत नव्हती . अखेर मला कळलं , तो नागपूर सोडून नोकरीसाठी गेलाय कुठेतरी .
मला त्याला कविता करूनच दाखवायची होती .आईला सांगितलंही होतं पण नाहीच त्यावेळी .
पण तो गेल्याचं सांगताच आईनी
” झालास पाठमोरा” ही आईनी लगेच छंद बद्ध कविता केली . तो तर गेलाच होता . आई म्हणाली “कुठेतरी पाठव” .
अखेर त्यावेळी असलेल्या दै . महाराष्ट्र मधे नेऊन दिली. ती छापून आली . आणि योगायोगाने तिला महाराष्ट्र साहित्य परिषद काव्य स्पर्धा पुरस्कार प्रथम क्रमांकाचा मिळाला.
राष्ट्रीय वाचनालयात माझा अकरा रूपये देऊन सत्कार करण्यात आला.
एकूण काय, आईमुळे मी कविता करणार होते. कदाचित लिहीणार होते .
पण त्या दिवशी राजविलास टॉकीज जवळ असलेल्या बुधवार बाजारात गेले . आणि उदबत्ती विकणारा एक पाच सहा वर्षांचा मुलगा ” ताई घे ना उदबत्ती” म्हणून मागे लागला .अगोदरच हातात एक रूपया होता. मी पुढे गेले तसं तो म्हणाला
“नको देऊन एक आणा पण, पण घेऊन तर जा ” अखेर मी थांबले .
“फुकट कशाला घेऊ ? घे एक आणा”
“ताई, माझ्या घरी देवासमोर उदबत्ती लावायला कुणी नाही. मी आणि माझा मोठा भाऊ दोघंच असतो .”
घरी आल्यावर मला काही सुचेना . आई वडिलांशिवाय राहणं किती कठीण आहे याची जाणीव इतकी तीव्र झाली की, माझ्या डोळ्यात पाणी आलं . मन भरून आलं आणि हातात फौऊंटन पेन घेऊन लिहायला सुरुवात केली . आई हे सारं पहात असावी . तिने ती वाचली आणि म्हणाली
आकाशवाणी वर बालविहार हा कार्यक्रम असतो असं ऐकलंय . कारण आमच्या रेडिओ नव्हताच .
कधी तरी मी ती बालकथा आकाशवाणी ला पाठवली . ती कथा तर त्यांनी घेतलीच पण त्यांनी मला पत्र पाठवून विचारलं .
बालविहारसाठी श्रुतिका लिहाल का?
मला ते सारं काहीही माहिती नव्हतं . पण संधी दार ठोठावत होती आणि आम्हाला घरी अतिशय गरजही होती .
प्रत्येकाच्या आयुष्यात संधी सतत दार ठोठावत असते पण ती कळते तेव्हाच, जेव्हा आपल्याला अत्यंत गरज असते.
मी ती संधी सोडणार नव्हते.

शुभांगी भडभडे

Leave a Reply