धरणात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : ७ फेब्रुवारी – अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील धामोडी पारद धरणात तिघे बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत धरणात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात बचाव पथकाला दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.
दर्यापूर तालुक्यातील घोशी येथील तायडे परिवार धामोडी पारद धरणावरून त्याच्या घरी जात असताना आई आणि मुलीचा पाय घसरून पाण्यात पडले असल्याची माहिती सुरक्षा रक्षकानं दिली आहे. २४ वर्षीय प्रिया गौरव तायडे असं मृत महिलेचं नाव आहे. तर प्रियाचा पती गौरव तायडे याला वाचवण्यास बचाव पथकाला यश आलं आहे. गौरव, प्रिया आणि त्यांची ३ वर्षाची मुलगी तिघेही धरणाजवळून जात असताना पाय घसरुन धरणात पडले.
दरम्यान मच्छीमार लोकांच्या लक्षात येताच त्यांनी गौरव तायडेला बाहेर काढले. मात्र प्रिया तायडे आणि आराध्या तायडे यांचा मृत्यू झाला आहे. तायडे परिवारात कौटुंबिक वाद सुरू असल्याने गौरवने पत्नी आणि मुलीला पाण्यात ढकल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतं आहे. त्यामुळे मृत्यू की घातपात हा तपास सध्या पोलीस करताहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अपघाताची मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.
चार वर्षापूर्वी गौरव आणि प्रिया यांचं लग्न झालं होतं. दोघांना एक तीन वर्षाची मुलगी आहे. गौरव आणि प्रिया यांचं वैवाहिक जीवनात वाद सुरु होते. दोघांमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. मात्र वादाचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.

Leave a Reply