किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

पुणे : ७ फेब्रुवारी – भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर शनिवारी शिवसैनिकांकडून पुणे महापालिकेच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच काही साथीदार यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरीट सोमैया यांनी ट्विट करत गुन्हा दाखल केलेल्या लोकांची नावे आणि घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
किरीट सोमैया शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. प्रथम ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्वीकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत त्यांच्या माकडहाडाला जबर दुखापत झाली होती. पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये सोमय्या यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना काल (रविवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 341, 336, 337 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरें यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार असल्याचा दावा, किरीट सोमैया यांनी ट्विट करत केला आहे. आपल्या या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात कोणती कलमं लावण्यात आली याचीही माहिती दिली आहे.

Leave a Reply