वैश्विक संगीत क्षेत्राची मोठी हानी – मनोहर म्हैसाळकर

नागपूर : ६ फेब्रुवारी – गानकोकीळा स्वरसम्राधनी लता मंगेशकर यांचे निधन होणे म्हणजे केवळ भारताच्याच नव्हे तर वैश्विक संगीत क्षेत्राची मोठी हानी असल्याच्या भावना विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी व्यक्त केल्या.
विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवा निमित्ताने विविध समित्यांचे गठन आणि त्या अनुषंगाने विचार विनीमय करण्याकरिता रविवारी सभेचे आजोजन करण्यात आले होते. परंतु, भारत रत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची वार्ता येताच ही सभा रद्द करण्यात आली व शोक सभेचे आयोजन करण्यात आले.
शोकसभेला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानकर यांची मंचावर उपस्थिती होती. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने शोक संवेदना व्यक्त करणारा एक ठराव पारित करण्यात आला. या शोक संवेदना लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांना पाठवण्यात येणार आहेत.
डॉ. रवींद्र शोभणे यांनी लता मंगेशकर, विदर्भ साहित्य संघ आणि मनोहर म्हैसाळकर यांच्या संबंधातील आठवणींना उजाळा दिला. लता मंगेशकर यांची गाणी ऐकत अनेक कलावंत घडले. त्यांच्या गाण्यामूळे अनेकांनी समाधी अवस्थेचा अनुभव घेतला असून अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. लता दिदींचे व्यक्तिमत्व इतके उत्तुंग आहे की यापुढे अशी गायिका होणार नाही, असे ते म्हणाले.
नाट्यकर्मी संजय भाकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेचे सूत्रसंचालन करतांना प्रकाश एदलाबादकर यांनी देखील अनेक आठवणी सांगितल्या.

Leave a Reply